गेल्या दोन आठवड्यात चेन्नईचा संघ खूप चर्चेत होता. त्याचे प्रमुख कारण म्हणजे संघ व्यवस्थापन व खेळाडू यांच्यापैकी १४ जणांना झालेली करोनाची लागण. दोन-तीन दिवसांपूर्वीच चेन्नई संघातील सर्वांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर BCCIच्या वैद्यकीय समितीतील सदस्यलाही लागण झाल्याचे सांगण्यात आले होते. तर आता करोनाचा दिल्ली संघात शिरकाव झाला आहे. दिल्ली संघाचे सहाय्यक फिजीओ यांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. त्यांना सध्या क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांचे आधीचे दोन चाचणी अहवाल निगेटिव्ह आले होते. पण तिसऱ्या अहवालात त्यांनी लागण झाल्याचं निदान झालं.

दिल्ली कॅपिटल्स संघाचे सहाय्यक फिजीओथेरपिस्ट यांना करोनाची लागण झाली आहे. ते सध्या नियमानुसार सक्तीच्या क्वारंटाइन कालावधीत आहेत. दुबईत दाखल झाल्यानंतर घेण्यात आलेल्या दोन चाचण्यांमध्ये ते निगेटिव्ह आढळले होते, पण त्यांच्या तिसऱ्या चाचणीचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आढळला आहे.

दरम्यान, दीर्घ काळ प्रतिक्षा केल्यानंतर IPL 2020चे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. BCCI आणि IPL गव्हर्निंग कौन्सिल यांच्याकडून ३० ऑगस्टच्या आसपास वेळापत्रक जाहीर करण्यात येणार होतं. पण अचान चेन्नईच्या संघातील १३-१४ जणांना करोनाची लागण झाल्याने वेळापत्रकात फेरबदल करण्यात आले.