IPL 2020मधील साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात चेन्नईने पंजाबविरूद्ध ९ गडी राखून विजय मिळवला. दीपक हुड्डाच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर पंजाबने १४५ धावा केल्या होत्या. मात्र पुणेकर ऋतुराज गायकवाडने नाबाद ६२ धावांची खेळी करत चेन्नईला अगदी सहज विजय मिळवून दिला. या सामन्यातील निकालामुळे चेन्नई आणि पंजाब दोन्ही संघांचा हा हंगामातील शेवटचा सामना ठरला. चेन्नईच्या संघाला स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला.

संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर अनुभवी फिरकीपटू इम्रान ताहीर याने एक भावनिक संदेश देणारं ट्विट केलं. “स्पर्धेचा शेवट विजयाने झाला याचा आनंद आहे. पण प्ले-ऑफ्समध्ये स्थान मिळाल्याचं दु:ख वाटतं. चाहत्यांनो, तुमच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही असं तुम्हाला वाटत असेल तर मला माफ करा. जर संधी मिळाली तर पुढच्या वर्षी मी दमदार पुनरागमन करून दाखवेन. तुम्ही दिलेला पाठिंबा आणि प्रेमासाठी धन्यवाद!”, असं त्याने ट्विट केलं.

दरम्यान, कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पण पंजाबच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. एकट्या दीपक हुड्डाने झुंज देत ३० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावा केल्या आणि संघाला १५३ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे सलामीवीर फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड जोडीने ८२ धावांची भागीदारी केली, डु प्लेसिस बाद झाल्यावर ऋतुराजने रायडूच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. ऋतुराजने ४९ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६२ धावा केल्या.