आयपीएलच्या तेराव्या हंगामात आव्हान संपुष्टात आलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने कोलकाता संघाचा पराभव केला आहे. गुरुवारी झालेल्या रंगतदार सामन्यात चेन्नईने कोलकात्यावर ६ गडी राखून मात केली. चेन्नईकडून पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
लागोपाठ दोन सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडचं कर्णधार धोनीनं कौतुक केलं आहे. धोनी म्हणाला की, ‘ऋतुराज गायकवाडला नेटमध्ये सराव करताना पाहिलं होतं. पण त्यानतर तो करोनाबाधित झाला अन् २० दिवसांसाठी बाहेर गेला होता. हे दर्भाग्यपूर्ण झालं पण ऋतुराज गायकवाड हा हंगाम कायम लक्षात ठेवेल. युवा प्रतिभावंत खेळाडूंपैकी ऋतुराज गायकवाड एक आहे. तो खूप कमी बोलतो त्यामुळे संघ प्रबंधनाला खेळाडू ओळखण्यात अडचण निर्णाण होती. ऋतुराज गायकवाडने फलंदाजी सुरु केल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तो कशा पद्धतीनं फटके मारत होता. त्याला हवं तसं तो चेंडूला टोलावत होता.’
Just heartwarming to see our Rocket Raja on a classic roll. #Yellove #WhistlePodu #WhistleFromHome #CSKvKKR pic.twitter.com/mqbTq3cSC5
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 29, 2020
दुबईच्या मैदानावर अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सवर ६ गडी राखून मात केली. या सामन्यात ५३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ऋतुराजने ७२ धावांची खेळी केली. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. काही दिवसांपूर्वी चेन्नईचा संघ सातत्याने खराब कामगिरी करत असताना धोनीने संघातील काही तरुणांमध्ये म्हणावा तसा स्पार्क दिसला नाही असं वक्तव्य केलं होतं. मात्र धोनीने तोपर्यंत किती खेळाडूंना संधी दिली असा प्रश्न विचारत नेटकऱ्यांनी धोनीवर टीका केली होती. अखेरीस ऋतुराज गायकवाडने आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत लागोपाठ अर्धशतक झळकावत आपल्यातला स्पार्क सिद्ध केला.