दुबईच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर मात करत मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासातलं पाचवं विजेतेपद पटकावलं. कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कर्णधार म्हणून रोहितचं हे पाचवं विजेतेपद होतं. या विजयानंतर सर्व स्तरातून रोहित आणि मुंबई इंडियन्स संघावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

विजयानंतर मैदानात रोहित शर्मामधला ‘बाप’माणूस सर्वांना दिसून आला. मुंबईचा जलदगती गोलंदाज धवल कुलकर्णी आपल्या मुलीला सोबत घेऊन मैदानावर उतरला होता. यावेळी रोहितने धवलच्या मुलीची खास मराठीतून विचारपूस करत झोपली नाहीस अजून?? काय झालं?? असं म्हणत विचारपूस केलं. मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

१५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरूवात केली. क्विंटन डी कॉक १२ चेंडूत २० धावा करून माघारी परतला, पण रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या साथीने डाव पुढे नेला. रोहितसोबत चांगली भागीदारी असतानाच सूर्यकुमार यादव धावचीत झाला. रोहित हळूच फटका खेळत एकेरी धाव घेण्यासाठी धावला पण रोहित-सूर्यकुमार यांच्यात धाव घेण्यावरून गोंधळ झाला. अखेर रोहित नॉन-स्ट्राईकला पोहोचल्याचं पाहून सूर्यकुमारने आपली क्रीज सोडली आणि स्वत:ला धावबाद करवून घेतलं. सूर्यकुमारने २० चेंडूत १९ धावा केल्या. रोहितने मात्र सूर्यकुमारच्या विकेटचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं नाही. त्याने ५१ चेंडूत दमदार ६८ धावा कुटल्या.