आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा युएईत खेळवण्यात येणार आहे. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता यंदाच्या स्पर्धेचं आयोजन युएईत करण्यात आलंय. युएईतही करोनाची परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने सर्व खेळाडू आणि संघातील इतर सदस्यांसाठी कडक नियम तयार केले आहेत. ICC च्या एलिट पॅनलमधील ४ पंच या स्पर्धेत पंच म्हणून काम पाहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार एकूण १६ पंच या स्पर्धेत काम पाहणार आहेत. ज्यात आयसीसीच्या एलिट पॅनलमधील ४ पंचांचा समावेश असणार आहे. ख्रिस गॅफनी (न्यूझीलंड), रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड), पॉल रेफेल (ऑस्ट्रेलिया) आणि नितीन मेनन (भारत) हे एलिट पॅनलमधील ४ पंच स्पर्धेत काम पाहतील. याव्यतिरीक्त इतर पंच हे बीसीसीआयच्या पॅनलमधील असणार आहेत.
१० सप्टेंबरपर्यंत सर्व पंच युएईत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यंदा करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता पंचांनाही Bio Security Bubble मध्ये रहावं लागणार आहे. तसेच नाणेफेकीदरम्यान दोन्ही कर्णधारांसोबत यंदा mascot हजर नसणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला जाण्यासाठी खेळाडूंच्या हातात ब्लू-टूथ बँड घातले जाणार असल्याचं समजतं आहे.