रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामात अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सवर मात केली. दिल्लीने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा सहभाग नोंदवला. रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर रोहित आणि सूर्यकुमार यांच्यात चोरटी धाव घेताना गोंधळ निर्माण झाला. ज्यामध्ये फॉर्मात असलेल्या रोहितची विकेट वाचवण्यासाठी सूर्यकुमारला आपल्या विकेटवर पाणी सोडावं लागलं. या प्रकारानंतर सोशल मीडियावर सूर्यकुमारचं कौतुक करण्यात आलं. घडलेल्या प्रकारावर सूर्यकुमारने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“आम्ही जेव्हा प्ले-स्टेशनवर FIFA चे सामने खेळत असतो हे त्यासारखं आहे. माझ्याकडे स्कोअर करण्याची चांगली संधी आहे पण रोहित माझ्यापेक्षा अधिक चांगल्या जागेवर असेल तर मी बॉल त्याला पास करेन…आणि माझी खात्री आहे रोहितनेही असंत केलं असतं. सरतेशेवटी संघाचा फायदा होतोय हे महत्वाचं.” सूर्यकुमार यादव इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.
यावेळी बोलत असताना सूर्यकुमारने रोहितच्या नेतृत्वाचंही कौतुक केलं. “कर्णधार या नात्याने रोहित सर्वांसाठी उपलब्ध असतो. फक्त मीच नाही तो सर्वांना मार्गदर्शन करत असतो. संघातील तरुण खेळाडूंशी पुढाकार घेऊन बोलल्यामुळे त्यांच्या मनातही कसल्या शंका राहत नाही आणि एक खेळीमेळीचं वातावरण तयार होतं.” आयपीएलचा तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. परंतू रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियात पोहचणार आहे.