आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएईत दाखल झालेल्या सुरेश रैनाने स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच माघार घेत भारतात परतण्याचा निर्णय घेतला. रैनाच्या परिवारातील सदस्यांवर पंजाबमध्ये हल्ला झाला. ज्यामुळे रैनाने त्वरित भारतात येणं पसंत केलं. सुरेश रैना माघारी परतल्यानंतर अनेक दिवस चर्चांना उधाण आलं होतं. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे मालक एन. श्रीनीवासन यांनी रैनाला आपला पाठींबा असल्याचं म्हटलं आहे. सुरेश रैना हा आपल्या मुलासारखाच असल्याचं श्रीनीवासन यांनी म्हटलं आहे.
“मी रैनाला माझ्या मुलासारखं वागवतो. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जच्या यशामागचं महत्वाचं कारण म्हणजे क्रिकेट विषयक निर्णयांमध्ये आम्ही कधीही नाक खुपसत नाही. India Cement ही आमची कंपनी १९६० पासून क्रिकेटशी निगडीत आहे. जोपर्यंत आम्ही क्रिकेटशी निगडीत आहोत तोपर्यंत असंच काम सुरु राहील. रैनाने संघात परत यावं की नाही हा माझा निर्णय नाही. संघ आमच्या मालकीचा आहे, पण आम्ही खेळाडूंचे मालक नाहीत.” श्रीनीवासन पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
मी संघाचा कर्णधार नाही. टीम मॅनेजमेंटला मी कधीही सल्ले देत नाही. कोणत्या खेळाडूला संघात घ्यायचं, लिलावात कोणावर बोली लावायची या गोष्टींमध्ये मी दखल देत नाही. यासाठी आमच्याकडे सर्वोत्तम कर्णधार आहे. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये मी कधीच लक्ष घालत नसल्याचं श्रीनीवासन यांनी सांगितलं.