इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून गुरुवारी रंगणाऱ्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन बलाढय़ संघ १३ व्या पर्वाच्या अंतिम फेरीत मजल मारण्यासाठी उत्सुक आहेत. चार वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने १४ पैकी ९ सामने जिंकत १८ गुणांनिशी गुणतालिकेवर वर्चस्व गाजवले. मात्र अखेरच्या सामन्यात त्यांना सनरायजर्स हैदराबादकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागल्याने त्यांचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला आहे. पहिलेवहिले जेतेपद पटकावण्यासाठी आतुर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने सलगच्या चार पराभवांनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला सहा गडी राखून पराभूत करत आपली गाडी रुळावर आणली आहे. दिल्लीने १६ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे.

आतापर्यंत झालेल्या स्पर्धेवर मुंबई इंडियन्सने वर्चस्व राखलं असलं तरीही प्ले-ऑफमध्ये समीकरणं बदलणार आहे. माजी भारतीय खेळाडू संजय बांगर यांच्यामते मुंबईला टक्कर देण्याची ताकद सध्या दिल्ली कॅपिटल्स या संघाकडेच आहे. “मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यावेळी प्ले-ऑफचे सामने येतात त्यामुळे तुम्ही याआधी कसा खेळ केला आहे या सर्व गोष्टी मागे पडतात. प्रत्येक संघ या सामन्यात एका वेगळ्या जोशात आणि सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याच्या हेतूने मैदानात उतरतो. दिल्लीकडे प्ले-ऑफचे सामने खेळण्याचा अनुभव नाही ही गोष्ट जरी खरी असली तरीही त्यांचा यंदाच्या हंगामातला प्रवास हा आश्वासक आहे. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये यश, त्यानंतर लागोपाठ अपयश आणि जिथे गरज आहे तिकडे चांगला खेळ करुन गुणतालिकेत दुसरं स्थान. या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला भरणा आहे. जर मुंबई इंडियन्सला टक्कर देण्याचं आवाहन कोणत्या संघात असेल तर ते फक्त दिल्लीकडेच आहे.”

कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन ही मुंबईसाठी जमेची बाजू आहे. मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे रोहितला चार सामन्यांना मुकावे लागले होते. पण सनरायजर्सविरुद्ध त्याला अपेक्षित पुनरागमन करता आले नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर गतविजेता मुंबईचा संघ सक्षम आहे. मात्र सनरायजर्सविरुद्ध मुंबईची फलंदाजी ढेपाळली होती. त्यामुळे दिल्लीविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात मुंबईला कामगिरी उंचवावी लागणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 Playoff : काय आहेत दोन्ही संघांसमोरची आव्हानं??

Story img Loader