रॉयल चँलेजर्स बंगळुरुचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहलीने एलिमिनेटरमधील पराभवासाठी आपल्या फलंदाजांना जबाबदार ठरवलं आहे. बंगळुरुचा हैदराबादने सहा गडी राखून पराभव केल्याने आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलं. विराट कोहलीने आपले फलंदाज हैदराबादच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात तसंच मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरल्याचं म्हटलं आहे. आरसीबीने प्रथम गोलंदाजी करताना सात विकेट्स गमावत १३१ धावसंख्या उभारली होती. आरसीबीकडून डेव्हिलिअर्सने ५६ धावा केल्या.

हैदराबादने केन विलियमसनने केलेल्या नाबाद ५० धावांच्या आधारे दोन चेंडू राखत विजय मिळवला. सामन्यात झालेल्या पराभवानंतर बोलताना विराट कोहलीने सांगितलं की, “आमच्या फलंदाजीबद्दल बोलायचं गेल्यास आम्ही आव्हानात्मक धावसंख्या उभारली नव्हती. आम्ही थोड्याशा अंतराने हरलो आहोत. जर आम्ही केन विलियमसनला आऊट केलं असतं तर कदाचित निकाल वेगळा असता. थोडक्यात सांगायचं तर आम्ही त्यांच्या गोलंदाजांना मनाप्रमाणे गोलंदाजी करु दिली आणि दबाव निर्माण केला नाही”.

केन विलियमसनचा झेल सुटला नसता तर कदाचित निकाल कदाचित वेगळा असता असं विराटने म्हटलं आहे. हैदराबादला १६ चेंडूत २८ धावांची गरज असताना देवदत्त पडिक्कलने सीमारेषेवर केन विलियमसनचा झेल सोडला. याची मोठी किंमत आरसीबीला चुकवावी लागली. कारण केन विलियमसनने नंतर अर्धशतक पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला.

“आमच्या फलंदाजांनी अनेकदा चांगल्या संधी दवडल्या. शेवटचे ४-५ सामने हे आमच्यासाठी खूपच विचित्र ठरले. यंदाच्या हंगामात देवदत्त पडीकल, मोहम्मद सिराज असे काही निवडक चेहरे चांगली कामगिरी करून गेले. युझवेंद्र चहल आणि डीव्हिलियर्सनेदेखील खूपच अप्रतिम कामगिरी केली. देवदत्त पडीकलचं विशेष कौतुक आहे कारण एकाच स्पर्धेत ४००हून अधिक धावा करणं ही सोपी गोष्ट नाही”, अशा शब्दात विराटने काही सकारात्मक गोष्टींबाबत भावना व्यक्त केल्या.

हैदराबादचा सामना आता दिल्ली कॅपिटल्ससोबत असणार आहे. अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ आमने-सामने असतील. रविवारी हा सामना होणार आहे.

Story img Loader