आयपीएलच्या आतापर्यंतच्या १२ हंगामांचा इतिहास तपासला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हे संघ आतापर्यंत एकदाही विजेतेपद पटकावू शकलेले नाहीत. २०१४ साली किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ अंतिम फेरीत पोहचला होता, परंतू विजेतेपद मिळवण्यात ते अपयशी ठरले होते. पंजाबच्या संघात अनेक गुणवान खेळाडूंचा भरणा आहे. पण तरीही प्रत्येक हंगामात अखेरच्या क्षणांमध्ये केलेल्या हाराकिरीमुळे पंजाबने सामना गमावला आहे.

यंदा लोकेश राहुलचा किंग्ज इलेव्हन पंजाब संघ विजेतेपद मिळण्यासाठी उत्सुक आहे. ३ महत्वाच्या कारणांमुळे यंदा पंजाब विजेतेपद पटाकवू शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे. जाणून घेऊयात काय आहेत ही कारणं…

१) अनिल कुंबळे आणि लोकेश राहुलची जोडी – मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार लोकेश राहुल या जोडीचा अनुभव यंदा पंजाबच्या संघासाठी फायदेशीर ठरु शकतो. हे दोन्ही खेळाडू कर्नाटकचे आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत कर्नाटकच्या संघाने केलेली कामगिरी ही वाखणण्याजोगी आहे. याव्यतिरीक्त पंजाबच्या संघात मयांक अग्रवाल, कृष्णप्पा गौतम आणि करुण नायर हे कर्नाटकाकडून चांगली कामगिरी केलेले खेळाडू आहेत. त्यामुळे पंजाबसाठी हे कर्नाटक कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीने जमून आल्यास ते यंदा नक्कीच चमत्कार करुन दाखवू शकतात.

अवश्य वाचा – चहलचा अजब हट्ट, IPL मध्ये फलंदाजीला सलामीला येण्याची मागणी ! प्रशिक्षकांनी नाही म्हणताच…

२) मधल्या फळीत अनुभवी फलंदाज – ग्लेन मॅक्सेवलच्या येण्यामुळे यंदा पंजाबच्या संघातील मधळी फळी ही अधिक मजबूत झाली आहे. ख्रिस गेल आणि लोकेश राहुल हे लवकर माघारी परतल्यास मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेल, मयांक अग्रवाल, करुण नायर, जिमी निशम यासारखे फलंदाज पंजाबच्या संघात आहेत. ज्यांच्याकडून संघाला फटकेबाजीची अपेक्षा आहे.

३) फिरकीपटू आणि जलदगती गोलंदाजांचा उत्तम समन्वय – गोलंदाजी हे पंजाबचं नेहमी बलस्थान राहिलेलं आहे. मुजीब उर-रेहमान, कृष्णप्पा गौतम, मुरगन आश्विन यांच्यासोबत भारताचा U-19 मधील खेळाडू रवी बिश्नोई हे नावाजलेले फिरकीपटू संघाकडे आहेत. तर जलदगती गोलंदाजीत मोहम्मद शमीच्या जोडीला, शेल्डन कोट्रेल, ख्रिस जॉर्डन असे अनुभवी गोलंदाज पंजाबकडे आहेत. त्यामुळे या सर्व गोलंदाजांनी आपली कामगिरी योग्य पद्धतीने बजावली तर पंजाबचा संघ यंदा नक्कीच विजेतेपद मिळवू शकतो.