शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर मात करत प्ले-ऑफमध्ये आपलं दुसरं स्थान पक्क केलं. परंतू १७.३ षटकांच्या आत सामना जिंकण्यात अपयश आल्यामुळे बंगळुरुच्या संघालाही प्ले-ऑफचं तिकीट मिळालं. बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली होती. परंतू तिसऱ्या क्रमांकावर संधी देण्यात आलेला अजिंक्य रहाणे आणि सलामीवीर शिखर धवन यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला.

प्रदीर्घ कालावधीनंतर अजिंक्य रहाणेला सूर गवसल्यामुळे हा सामना दिल्लीसाठी अत्यंत महत्वाचा ठरला. मैदानात बंगळुरुच्या गोलंदाजांचा संयमी सामना करत असताना अजिंक्यने ४६ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ६० धावांची खेळी केली. अजिंक्यसोबत युएईत आलेली पत्नी राधिका आणि आर्या हा सामना टिव्हीवर पाहत होत्या. आपल्या बाबाने हाफ सेंच्युरी झळकावल्यानंतर आर्यालाही आनंद गगनात मावेनासा झाला आणि तिने टाळ्या वाजवत आपला आनंद साजरा केला.

प्ले-ऑफच्या पहिल्या सामन्यात मुंबईचा सामना आता मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला हैदराबाद किंवा कोलकाता या पैकी एका संघाशी दोन हात करावे लागणार आहेत.

Story img Loader