– प्रथमेश दीक्षित

युएईत सुरु असलेला आयपीएलचा तेरावा हंगाम आता मध्यावधीकडे झुकत चालला आहे. प्रत्येक संघांमध्ये आता गुणतालिकेत पहिल्या चार स्थानांवर येण्यासाठीची धडपड सुरु झाली आहे. यंदा करोनामुळे अनेक नियम आणि अटीं सोबत घेऊन ही स्पर्धा खेळवली जात आहे. परंतू स्पर्धेतला थरार कायम आहे. बहुतांश सामने हे अखेरच्या षटकांपर्यंत रंगत आहेत. चौकार-षटकारांची आतिषबाजी, गोलंदाजांचे अथक प्रयत्न यामुळे प्रत्येक सामना रंगतो आहे. यंदाच्या हंगामात संजू सॅमसन, राहुल तेवतिया, इशान किशन, रवी बिश्नोई, टी. नटराजन यासारखे अनेक तरुण भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत पूढे आले आहेत.

परंतू स्पर्धेत सहभागी झालेल्या आठही संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करायला गेला तर संघातील प्रमुख परदेशी खेळाडूच संघाचा आधारस्तंभ बनलेले दिसत आहेत. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात भारतीय खेळाडू आणि परदेशी खेळाडूंमध्ये चांगलीच लढत रंगताना दिसते. यंदा भारतीय खेळाडूंनीही परदेशी खेळाडूंच्या तोडीस तोड कामगिरी केली असली तरीही अनुभवाची गोष्ट जिकडे येते तिकडे अजुनही परदेशी खेळाडूच चमकताना दिसत आहेत.

१) मुंबई इंडियन्स – मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत भारतीय आणि परदेशी खेळाडूंचा योग्य समन्वय साधला आहे. कायरन पोलार्ड, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन आणि क्विंटन डी-कॉक या ४ परदेशी खेळाडूंना मुंबईने संघात स्थान दिलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईने संघातल्या प्रत्येक परदेशी खेळाडूसाठी पर्याय तयार करुन ठेवला आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये जिथे क्विंटन डी-कॉकची कामगिरी चांगली झाली नाही तिकडे मधल्या फळीत इशान किशन-कायरन पोलार्ड चमकले. हैदराबादविरुद्ध सामन्यात क्विंटन डी-कॉकला सूर गवसला. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईचे परदेशी खेळाडू एका क्षेत्रात कमी पडले तर दुसऱ्या बाबतीत ते आपली चूक भरुन काढत आहेत. पोलार्ड फलंदाजीत कमी पडला तर तो मैदानात गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात आपली चमक दाखवतो आहे. पॅटिन्सन-बोल्टची जोडी महत्वाचे बळी मिळवण्याचं काम करत आहे. याच कारणासाठी कर्णधार रोहित शर्माने गेल्या काही सामन्यांपासून एक बदल वगळता संघात फारसे बदल केले नाहीत.

२) दिल्ली कॅपिटल्स – मुंबई इंडियन्स नंतर दिल्लीच्या संघाने यंदाच्या हंगामात आपल्या संघाची सुरेख बांधणी केली आहे. कगिसो रबाडा, स्टॉयनिस, नॉर्ट्जे आणि हेटमायर अशा ४ प्रमुख खेळाडूंना आतापर्यंत दिल्लीने संघात संधी दिली आहे. कगिसो रबाडा १२ बळी घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे दिल्लीचा कर्णधार आपल्या संघातील परदेशी खेळाडूंचा खुबीने वापर करतो आहे. गोलंदाजीत कगिसो रबाडाची षटकं डेथ ओव्हर्समध्ये वाचवून ठेवणं. फलंदाजीत गरजेनुसार स्टॉयनिसला बढती देणं तसेच गोलंदाजीत त्याचा वापर करणं अशा सुरेख समन्वयामुळे दिल्लीचा संघ यंदा पहिल्या चार स्थानांच्या शर्यतीत आहे. याव्यतिरीक्त नॉर्ट्जेनेही आपल्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत आपली चमक दाखवली आहे.

३) सनराईजर्स हैदराबाद – हैदराबादचा संघ अजुनही संघातील परदेशी खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो ही हैदराबादची सलामीची जोडी संघाचा प्रमुख कणा मानली जाते. ज्या सामन्यांत या जोडीला सूर गवसतो त्या सामन्यात हैदराबादचा संघ बहार उडवून देतो. पंजाबविरुद्ध सामन्यात हैदराबादने मिळवलेला ६९ विजय हा याचंच उदाहरण आहे. याव्यतिरीक्त वॉर्नर-बेअरस्टो जोडी अपयशी ठरल्यास मधल्या फळीत केन विल्यमसनचा अनुभव आणि गोलंदाजीत राशिद खान हे प्रमुख खेळाडू संघाचा भार सावरुन आहेत. यंदा हैदराबादकडून अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, टी. नटराजन, खलिल अहमद यासारख्या तरुण भारतीय खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली आहे. परंतू त्यांच्या कामगिरीत सातत्य नाही, ज्यामुळे आजही हैदराबादचा संघ परदेशी खेळाडूंच्या खांबांवर उभा आहे असं म्हणायला वाव आहे.

४) कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सचा संघ मात्र याला काहीसा अपवाद ठरला आहे. संघातील परदेशी खेळाडूंच्या सोबतीने भारतीय खेळाडूही तोडीस तोड कामगिरी करत आहेत. मॉर्गन, रसेल, नारायण आणि पॅट कमिन्स या चार प्रमुख खेळाडूंना कोलकाता संघात स्थान देतं. दिनेश कार्तिक सध्या चांगल्या फॉर्मात नाही. त्यामुळे मॉर्गनसारख्या खेळाडूचं संघात असणं कोलकात्यासाठी फायदेशीर ठरतंय. पण या जोडीलाच शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, शिवम मवी, कमलेश नागरकोटी, वरुण चक्रवर्ती यासारख्या तरुण भारतीय खेळाडूंचं योगदान विसरुन चालता येणार नाही. चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात वरुण चक्रवर्तीने कमी धावसंख्या डिफेंड असतानाही धोनीला ज्या पद्धतीने बाद केलं ते वाखणण्याजोगं होतं. याव्यतिरीक्त मवी, नागरकोटी या तरुण वेगवान गोलंदाजांनीही आपली चमक दाखवली आहे.

५) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – आरसीबीची यंदाच्या हंगामातली कामगिरी ही संमिश्र स्वरुपाची राहिली आहे. त्याचप्रमाणे संघात भारतीय आणि परदेशी खेळाडूंचं योगदानही संमिश्र राहिलेलं आहे. देवदत पडीकलच्या रुपाने यंदा आरसीबीला चांगला सलामीवीर सापडला आहे. नवदीप सैनी गोलंदाजीत कमाल कामगिरी करतो आहे. परंतू संघ आजही एबी डिव्हीलियर्स आणि फिंच यांच्यावर अवलंबून असल्यासारखा वाटतो. ज्या सामन्यांत फिंच आणि डिव्हीलियर्स चांगली कामगिरी करतात त्या सामन्यांत आरसीबीचा संघ चांगली कामगिरी करताना दिसला आहे. विराटने एका सामन्यात आश्वासक खेळी केली असली तरीही तो अजुन पूर्णपणे फॉर्मात आलेला नाही. आजही RCB ला दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस दुखापतीमधून लवकर सावरुन संघात येईल ही आशा आहे. गोलंदाजीत युजवेंद्र चहलही आश्वासक कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलतो आहे.

६) चेन्नई सुपरकिंग्ज – आयपीएलच्या बारा हंगामात फार अभावाने दिसणारं चित्र यंदाच्या हंगामात पहायला मिळतं आहे. एरवी नेहमी अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा चेन्नई सुपरकिंग्जचा संघ यंदाच्या हंगामाता अजुनही आपल्या संघाची घडी व्यवस्थित बसवू शकलेला नाही. सुरेश रैना आणि हरभजन सिंहची अनुपस्थितीत अजुनही संघाला जाणवते आहे. शेन वॉटसन, फाफ डु-प्लेसिस ही सलामीची जोडी संघासाठी महत्वाची आहे. मात्र वॉटसनच्या कामगिरीत यंदा सातत्य दिसत नाही. फाफ डु-प्लेसिस एकाकी झुंज देताना दिसतो परंतू इतर खेळाडूंच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. सॅम करनच्या रुपाने चेन्नईला यंदा चांगला अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे. परंतू संघाला विजय मिळवून देईल अशी खेळी अद्याप त्याच्याकडून झालेली नाही.

७) राजस्थान रॉयल्स – चेन्नई सुपरकिंग्ज संघावर मात करुन आश्वासक सुरुवात करणाचा राजस्थानचा संघ यंदा पुन्हा एकदा तळातल्या स्थानावर फेकला गेला आहे. आजही स्टिव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर यासारख्या प्रमुख खेळाडूंच्या कामगिरीवर संघाची मदार आहे. तेराव्या हंगामातही ज्या जिथे-जिथे परदेशी खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली तिकडे संघाला विजय मिळाला आहे. परंतू गेल्या काही दिवसांपासून स्मिथच्या बॅटीतून धावांचा ओघ ओसरला आहे. शारजाचं मैदान वगळता संजू सॅमसन, राहुल तेवतियासारखे फलंदाज चमक दाखवू शकत नाहीयेत. टॉम करन, जोफ्रा आर्चर यांच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. आजही संघाची बरीचशी मदार ही बेन स्टोक्सवर असल्याचं जाणवतंय. वडिलांवर उपचार करण्यासाठी युएईत उशीराने दाखल झालेला बेन स्टोक्स लवकरात लवकर संघात सहभागी होईल अशी राजस्थानच्या खेळाडूंना आशा आहे. याव्यतिरीक्त रियान पराग, जयदेव उनाडकट यासारखे खेळाडूही आपली चमक दाखवू शकलेले नाहीत.

८) किंग्ज ११ पंजाब – ख्रिस गेलसारखी मुलूखमैदान तोफ संघात असतानाही त्याला आतापर्यंत संधी न देणं…गोलंदाजीत मुजीब उर रेहमानला संधी न मिळणं पंजाबला चांगलंच शेकलं आहे. लोकेश राहुल-मयांक अग्रवाल ही जोडी यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करते आहे. दोन्ही फलंदाज सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या शर्यतीत आहेत. परंतू गोलंदाजांकडून न मिळणारी साथ यामुळे पंजाबची बाजू लंगडी वाटते. फलंदाजीत निकोलस पूरन आपली कामगिरी चोख बजावतो आहे. पण गेलसारख्या फटकेबाजी करणाऱ्या खेळाडूला संघात स्थान न मिळणं हा खरंच चर्चेचा विषय बनला आहे. याव्यतिरीक्त युवा फिरकीपटू रवी बिश्नोईने यंदा आपली चांगली चमक दाखवली आहे. मोहम्मद शमीचा मारा आश्वासक असला तरीही त्याच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही.

prathmesh.dixit@indianexpress.com

Story img Loader