करोनाचा धोका लक्षात घेता IPL 2020 स्पर्धा युएईला हलवण्यात आली. १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर असा स्पर्धेचा कालावधीही निश्चित करण्यात आला. सर्व संघ नियमानुसार युएईत दाखल झाले आणि क्वारंटाइन कालावधी संपवून सरावाला उतरले. त्यानंतर बहुप्रतिक्षित असे स्पर्धेचे वेळापत्रकही रविवारी जाहीर करण्यात आले. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि उपविजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरूवात होणार हे ठरलं. या दरम्यान, आज BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याने एक फोटो पोस्ट केला.
गेल्या दोन आठवड्यात चेन्नईचा संघ खूप चर्चेत होता. संघ व्यवस्थापन व खेळाडू यांच्यापैकी १४ जणांना करोनाची लागण झाली होती. दोन-तीन दिवसांपूर्वीच चेन्नई संघातील सर्वांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर BCCIच्या वैद्यकीय समितीतील सदस्यलाही लागण झाल्याचे सांगण्यात आले होते. तर त्यानंतर करोनाचा दिल्ली संघात शिरकाव झाला. दिल्ली संघाचे सहाय्यक फिजीओ यांना करोनाची लागण झाली. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने एक फोटो पोस्ट केला. युएईमध्ये IPLची तयारी कशाप्रकारे सुरू आहे? याची पहाणी करण्यासाठी आज गांगुली भारतातून रवाना झाला. विमानात बसण्याआधी त्याने एक फोटो पोस्ट केला. त्यात त्याने करोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक फेस शिल्ड आणि मास्क घातले होते. “६ महिन्यांच्या कालावधीत माझा हा पहिलाच विमानप्रवास आहे. IPLसाठी मी दुबईला चाललो आहे. पण त्याचसोबत काही बदललेल्या गोष्टींचेही मी पालन करतो आहे”, असे कॅप्शन गांगुलीने लिहिलं.
दरम्यान, आता बहुतांश संघाचे सर्व खेळाडू युएईमध्ये दाखल झाले आहेत. फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे काही खेळाडू अद्याप वन डे मालिका सुरू असल्याने इंग्लंडमध्येच आहेत. लवकरच तेदेखील युएईमध्ये दाखल होणार असून आपापल्या संघात दाखल होतील अशी माहिती देण्यात आली आहे.