आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं वेळापत्रक नुकतचं जाहीर करण्यात आलं. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. मात्र स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच राजस्थान रॉयल्स संघासमोर संकट निर्माण झालं आहे. संघाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यंदाच्या हंगामात सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेन स्टोक्सच्या वडीलांवर न्यूझीलंडमध्ये ब्रेन कॅन्सरचे उपचार सुरु आहेत. यासाठी पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका अर्ध्यावर सोडून बेन स्टोक्स आपल्या वडिलांची काळजी घेण्यासाठी न्यूझीलंडला परतला होता.
“न्यूझीलंडमधील नियमांनुसार नुकताच बेन स्टोक्सने आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. यानंतर तो आपल्या वडिलांना भेटेल. त्याच्या वडिलांना गंभीर आजार झाल्यामुळे पुढचे काही दिवस तो त्यांच्यासोबतच राहिल यात काही शंका नाही. त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यांसाठी तो उपलब्ध नसेल हे आम्ही धरुन चाललो आहोत. आम्ही त्याला संपर्कही करणार नाही, कारण सध्या त्याच्या वडिलांची तब्येत हे त्याच्यासमोर पहिलं प्राधान्य आहे. त्याला आपल्या परिवारासोबत वेळ घालवू दे मग आयपीएलमध्ये खेळण्याबाबत आम्ही चर्चा करु.” राजस्थान रॉयल्समधील महत्वाच्या सूत्रांनी Sportsstar ला माहिती दिली.
अवश्य वाचा – एका क्लिकवर जाणून घ्या आयपीएल २०२० चं संपूर्ण वेळापत्रक
राजस्था रॉयल्सने बेन स्टोक्ससाठी १२.५ कोटी रुपये मोजले होते. दरम्यान राजस्थानच्या खेळाडूंनी तेराव्या हंगामाची जोरदार तयारी सुरु केली असून राजस्थानचा यंदाच्या हंगामात पहिला सामना २२ सप्टेंबर रोजी चेन्नई सुपरकिंग्जसोबत होणार आहे.