आयपीएलचा तेरावा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. युएईत दाखल झालेल्या सर्व संघांनी आता सरावाला सुरुवातही केली आहे. मुंबईकर खेळाडू आणि भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. आतापर्यंत अजिंक्य आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधीत्व करत होता. तेराव्या हंगामासाठी राजस्थानने Player Transfer Window अंतर्गत अजिंक्यला दिल्लीच्या ताफ्यात दिलं.

मात्र यंदाचा हंगाम अजिंक्य रहाणेसाठी फारसा सोपा नसेल. शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, शेमरॉन हेटमायर, ऋषभ पंत यासारख्या फलंदाजांच्या यादीत अजिंक्यला स्वतःचं स्थान निर्माण करावं लागेलं. यंदाच्या हंगामात अजिंक्यने मधल्या फळीत फलंदाजी करण्याची तयारी दाखवली आहे. पण तरीही संघात स्थान निर्माण करण्यासाठी अजिंक्यला संघर्ष हा करावाच लागणार आहे.