आयपीएलच्या तेराव्या हंगामात दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सची गणितं काही केल्या जुळून येताना दिसत नाहीयेत. गेल्या काही सामन्यांपासून वारंवार अपयशी ठरत असतानाही KKR चं संघ व्यवस्थापन सुनिल नारायणला सलामीला फलंदाजीसाठी संधी देत राहिलं. सोशल मीडियावर टिकेचा सूर वाढल्यानंतर KKR ने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात राहुल त्रिपाठीला सलामीला पाठवत अपेक्षित बदल केला. राहुल त्रिपाठीनेही आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत धडाकेबाज अर्धशतक झळकावलं.

एकीकडे कोलकात्याचे सर्व फलंदाज अपयशी ठरत असताना राहुल त्रिपाठीने एक बाजू लावून धरत चेन्नईच्या गोलंदाजांचा नेटाने सामना केला. ५१ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने राहुलने ८१ धावांची खेळी केली. सलामीला फलंदाजीसाठी आल्यानंतर राहुलची कामगिरी ही नेहमी चांगली राहिलेली असतानाही आतापर्यंत त्याला संधी का देण्यात आली नाही याबद्दल क्रिकेटप्रेमी आश्चर्य व्यक्त करत आहेत. एक नजर राहुल त्रिपाठीच्या आकडेवारीवर…

त्रिपाठीला सलामीला पाठवत KKR ने आपली एक चूक सुधारली, पण काही केल्या सुनिल नारायणवरचं कोलकात्याचं प्रेम कमी होताना दिसत नाहीये. नितीश राणा माघारी परतल्यानंतर जिथे मॉर्गन फलंदाजीसाठी येणं अपेक्षित होतं तिकडे KKR ने पुन्हा एकदा नवीन प्रयोग करत नारायणला संधी दिली. एक-दोन फटके खेळत नाराणयने काही धावा केल्या…पण इथेही त्याच्या पदरी अपयशच आलं. मॉर्गनआधी नारायणला फलंदाजीसाठी पाठवल्याबद्दलही सोशल मीडियावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

चेन्नईच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत कोलकात्याच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. शेवटपर्यंत झुंज देणारा राहुल त्रिपाठीही माघारी परतला. त्याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावरच KKR १६७ धावांचा पल्ला गाठू शकलं. त्यामुळे KKR आपल्या चुकांमधून कधी शिकणार असा प्रश्न आता चाहते विचारत आहेत.

Story img Loader