जगभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदाची आयपीएल स्पर्धा होणार की नाही यावरुन काही महिन्यांपूर्वी बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. परंतू बीसीसीआयने सर्व अडचणींवर मात करत युएईत या स्पर्धेचं आयोजन केलं. तब्बल दीड महिन्यापेक्षा जास्त काळ सुरु असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना जवळ येऊन ठेपला असून पहिल्यांदा आयपीएलची फायनल खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्णधार श्रेयस अय्यरने आजच्या सामन्यासाठी संघात बदल केलेले नसले तरीही मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने अंतिम सामन्यात एक मोठा डाव खेळला आहे. फिरकीपटू राहुल चहरच्या जागेवर मुंबईने जयंत यादवला संघात स्थान दिलं आहे. नाणेफेकीदरम्यान रोहितने या बदलाविषयी माहिती दिली. “चहरने आमच्यासाठी चांगली कामगिरी केली आहे यात वाद नाही. परंतू दिल्लीच्या संघात ४ डावखुरे फलंदाज आहेत. त्यांच्याविरोधात जयंत यादवची ऑफ स्पिन गोलंदाजी कामी येईल असा आमचा अंदाज आहे. यासाठी अंतिम सामन्यात जयंतला स्थान देण्यात आलं आहे.”
अवश्य वाचा – IPL 2020 : रोहित शर्माचं विक्रमी ‘द्विशतक’, धोनीच्या यादीत मिळवलं स्थान
दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या आयपीएलच्या इतिहासात आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. दिल्लीविरुद्धचा अंतिम सामना हा रोहित शर्माचा आयपीएलमधला द्विशतकी सामना ठरला आहे. महेंद्रसिंह धोनीनंतर २०० वा सामना खेळणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू ठरला आहे.