IPL 2020 FINAL MI vs DC: IPL 2020च्या अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. दुबईच्या मैदानावर झालेल्या फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे IPL विजेतेपद ठरले.

१५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरूवात केली. क्विंटन डी कॉक १२ चेंडूत २० धावा करून माघारी परतला, पण रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या साथीने डाव पुढे नेला. रोहितसोबत चांगली भागीदारी असतानाच सूर्यकुमार यादव धावचीत झाला. रोहित हळूच फटका खेळत एकेरी धाव घेण्यासाठी धावला पण रोहित-सूर्यकुमार यांच्यात धाव घेण्यावरून गोंधळ झाला. अखेर रोहित नॉन-स्ट्राईकला पोहोचल्याचं पाहून सूर्यकुमारने आपली क्रीज सोडली आणि स्वत:ला धावबाद करवून घेतलं. सूर्यकुमारने २० चेंडूत १९ धावा केल्या. रोहितने मात्र सूर्यकुमारच्या विकेटचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं नाही. त्याने ५१ चेंडूत दमदार ६८ धावा कुटल्या.

रोहितची दमदार खेळी

तो बाद झाल्यावर इशान किशन आणि कृणाल पांड्या जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. मुंबईचे हे पाचवे IPL विजेतेपद ठरले, तर रोहितसाठी एखाद्या संघाचे प्रतिनिधीत्व करताना हे सहावे IPL विजेतेपद ठरले. २००९ला डेक्कन चार्जर्सच्या IPL विजेत्या संघातही रोहितचा समावेश होता.

त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. स्टॉयनीस (०), अजिंक्य रहाणे (२) आणि शिखर धवन (१५) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी ९६ धावांची भक्कम भागीदारी केली. ऋषभ पंतने ३८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यरने योग्य वेळी कर्णधारपदाला साजेशी खेळी केली.

श्रेयसचं धडाकेबाज अर्धशतक

श्रेयस अय्यरने ५० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार खेचत नाबाद ६५ धावांची खेळी करत संघाला १५० पार मजल मारून दिली. ट्रेंट बोल्टने ३, कुल्टरनाईलने २ तर जयंत यादवने १ बळी टिपला.

Live Blog

22:39 (IST)10 Nov 2020
दमदार खेळीनंतर रोहित शर्मा झेलबाद; सामन्यात रंगत

मुंबईचा 'हिटमॅन' कर्णधार रोहित शर्मा दमदार खेळी करत होता. पण उसळत्या चेंडूवर रोहितला झेलबाद व्हावे लागले. रोहितने ५१ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत ५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

22:21 (IST)10 Nov 2020
मुंबईच्या 'हिटमॅन'चं धडाकेबाज अर्धशतक

मुंबईचा 'हिटमॅन' रोहित शर्मा याने महत्त्वाच्या सामन्यात पुन्हा एकदा उपयुक्त खेळी करून दाखवली. कर्णधारपदाला साजेशी खेळी करत रोहितने ३६ चेंडूमध्ये ३ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने अर्धशतक झळकावले.

22:16 (IST)10 Nov 2020
धाव घेण्यावरून गोंधळ; सूर्यकुमार माघारी

कर्णधार रोहित शर्मासोबत चांगली भागीदारी असतानाच सूर्यकुमार यादव धावचीत झाला. रोहित हळूच फटका खेळत एकेरी धाव घेण्यासाठी धावला पण रोहित-सूर्यकुमार यांच्यात धाव घेण्यावरून गोंधळ झाला. अखेर रोहित नॉन-स्ट्राईकला पोहोचल्याचं पाहून सूर्यकुमारने आपली क्रीज सोडली आणि स्वत:ला धावबाद करवून घेतलं. सूर्यकुमारने २० चेंडूत १९ धावा केल्या.

21:59 (IST)10 Nov 2020
मुंबईचा 'पॉवर-प्ले'; रोहित-सूर्यकुमारची दमदार फटकेबाजी

दिल्लीच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत मुंबई इंडियन्सने पॉवर-प्ले म्हणजेच डावाच्या पहिल्या ६ षटकात तब्बल ६१ धावा कुटल्या. मुंबईच्या फलंदाजांनी या षटकांमध्ये ५ चौकार आणि ४ षटकार खेचत संघाला भक्कम सुरूवात मिळवून दिली.

21:50 (IST)10 Nov 2020
श्रेयस अय्यरची कर्णधारपदाला साजेशी खेळी

संघ संकटात सापडलेला असताना श्रेयसची ऋषभ पंतसोबत महत्वपूर्ण भागीदारी. अखेरपर्यंत मैदानावर तळ ठोकत केली नाबाद ६५ धावांची खेळी. धडाकेबाज खेळीसह श्रेयस अय्यरला दिग्गज फलंदाजांच्या पंगतीत स्थान, जाणून घ्या सविस्तर

21:50 (IST)10 Nov 2020
क्विंटन डी कॉक झेलबाद; मुंबईला पहिला धक्का

जबरदस्त वेगाने फलंदाजी करणारा क्विंटन डी कॉक स्टॉयनीसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि मुंबईला पहिला धक्का बसला. १२ चेंडूत त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावत २० धावा केल्या. पण शरीराजवळच्या चेंडूवर फटका खेळताना डी कॉक माघारी परतला.

21:43 (IST)10 Nov 2020
मुंबईच्या सलामीवीरांची धडाकेबाज सुरूवात

१५७ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या सलामीवीरांनी धडाकेबाज सुरूवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि डावखुरा क्विंटन डी कॉक जोडीने फिरकीपटू अश्विन आणि इतर वेगवान गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

21:16 (IST)10 Nov 2020
कर्णधार श्रेयसची दमदार खेळी; मुंबईला १५७ धावांचं लक्ष्य

आपल्या पहिल्यावहिल्या अंतिम सामन्यात दिल्लीने २० षटकांत १५६ धावा केल्या आणि चार वेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले. दिल्लीच्या संघाची सुरूवात काहीशी खराब झाली होती, पण कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या जोडीने संघाचा डाव सावरत सन्मानजनक धावसंख्या उभारली. ऋषभ पंतने स्पर्धेतील पहिले अर्धशतक ठोकत ५६ धावा केल्या. श्रेयस अय्यरने नाबाद ६५ धावांची खेळी करत संघाला १५० पार मजल मारून दिली.

21:04 (IST)10 Nov 2020
धडाकेबाज हेटमायर स्वस्तात माघारी

हैदराबादविरूद्धच्या सामन्यात २२ चेंडूत ४२ धावांची धडाकेबाज खेळी करणारा शिमरॉन हेटमायर आजच्या सामन्यात मात्र पूर्णपणे अयशस्वी ठरला. ५ चेंडूच्या खेळात त्याने केवळ १ चौकार लगावला. ट्रेंट बोल्टच्या स्मार्ट गोलंदाजीवर तो ५ धावा काढून माघारी परतला.

20:59 (IST)10 Nov 2020
कर्णधार श्रेयस अय्यरचं दमदार अर्धशतक

दिल्लीचा संघ संकटात असताना मैदानावर आलेल्या श्रेयस अय्यरने योग्य वेळी कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. अय्यरने ४० चेंडूमध्ये मोक्याच्या क्षणी चौकार-षटकारांची आतषबाजी करत अर्धशतक पूर्ण केलं.

20:49 (IST)10 Nov 2020
अर्धशतकानंतर लगेच ऋषभ पंत माघारी

IPL 2020मध्ये आपले पहिलेवहिले अर्धशतक ठोकणारा ऋषभ पंत मोठा फटका खेळताना हार्दिक पांड्याकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने ३८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह खेचत ५६ धावा केल्या. पण अर्धशतकानंतर लगेच ऋषभ पंत बाद झाला.

अवश्य वाचा - IPL 2020 : देर आए दुरुस्त आए, मोक्याच्या क्षणी ऋषभला गवसला सूर पण...

20:47 (IST)10 Nov 2020
महत्त्वाच्या सामन्यात ऋषभ पंतचे दमदार अर्धशतक

संपूर्ण स्पर्धेत फारशी चमक न दाखवता आलेल्या डावखुऱ्या ऋषभ पंतने महत्त्वाच्या सामन्यात आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली. त्याने ३४ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार खेचत दमदार अर्धशतक पूर्ण केलं.

20:38 (IST)10 Nov 2020
श्रेयस-ऋषभचा मुंबईच्या गोलंदाजीवर हल्लाबोल

२२ धावांवर महत्त्वाचे ३ गडी बाद झालेले असताना कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत हे दोघे मैदानात आले. नव्या दमाच्या या जोडीने दिल्लीचा डाव केवळ सावरलाच नाही, तर दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला आणि १३ षटकात संघाला शंभरी गाठून दिली.

20:32 (IST)10 Nov 2020
मोक्याच्या क्षणी ऋषभ पंतला गवसला सूर

आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये अपयशाचा सामना करणाऱ्या ऋषभ पंतला अखेरीस अंतिम सामन्यात सूर गवसला आहे. संघ संकटात सापडलेला असताना ऋषभची कर्णधार श्रेयस सोबत महत्वपूर्ण भागीदारी...हंगामातील सर्वोच्च धावसंख्येची नोंद अंतिम सामन्यात...

20:28 (IST)10 Nov 2020
कर्णधार श्रेयस अय्यर - ऋषभ पंतची जोडी जमली.

विकेटसाठी मुंबई इंडियन्स करतंय गणपती बाप्पाचा धावा 

20:16 (IST)10 Nov 2020
सामन्याच्या पहिल्या टप्प्यावर मुंबईचं वर्चस्व

अंतिम सामन्याच्या पहिल्या टप्प्यावर म्हणजेच टाईम-आऊटच्या आधीच्या ९ षटकांच्या खेळावर मुंबईने वर्चस्व गाजवलं. मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीला ५९ धावांवर रोखलं आणि ३ गड्यांना माघारी धाडलं.

20:11 (IST)10 Nov 2020
जयंत यादवला संघात स्थान देण्याची रोहितची रणनिती सफल

राहुल चहरऐवजी अंतिम सामन्यात जयंत यादवला स्थान देण्याच्या रोहितच्या निर्णयावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. परंतू दिल्लीच्या संघातील डावखुऱ्या फलंदाजांविरोधात जयंतचा अनुभव कामी येईल या हेतून रोहितने जयंतला स्थान दिलं. जयंतनेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. जाणून घ्या...

19:50 (IST)10 Nov 2020
धवन स्वस्तात माघारी; जयंतने उडवला त्रिफळा

अप्रतिम लयीत असलेला दिल्लीचा गब्बर फलंदाज शिखर धवन महत्त्वाच्या सामन्यात मात्र स्वस्तात माघारी परतला. राहुल चहरच्या जागी संघात स्थान मिळालेल्या जयंत यादवने धवनला बरोबर जाळ्यात अडकवलं. धवनने ३ चौकारांसह १३ चेंडूत १५ धावांवर केल्या.

19:48 (IST)10 Nov 2020
स्टॉयनिसला बाद करत बोल्टने केला विक्रम

आयपीएल अंतिम सामन्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अनोखी कामगिरी, जाणून घ्या...

19:44 (IST)10 Nov 2020
अजिंक्य रहाणे झेलबाद; बोल्टला दुसरं यश

संपूर्ण हंगामात केवळ एक अर्धशतक ठोकणाऱ्या अजिंक्य रहाणेची कामगिरी आजच्या सामन्यातही वाईटच झाली. ट्रेंट बोल्टने लेग साईडला टाकलेल्या चेंडूवर रहाणे झेलबाद झाला. रहाणेने केवळ दोन धावा केल्या.

19:32 (IST)10 Nov 2020
सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर स्टॉयनीस झेलबाद

सलामीला आलेल्या मार्कस स्टॉयनीसला पहिल्याच चेंडूवर झेलबाद होऊन परतावे लागले. ट्रेंट बोल्टने त्याला माघारी धाडलं. फायनलमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

19:21 (IST)10 Nov 2020
मुंबईने संघात केला एक महत्त्वाचा बदल...

अंतिम फेरीसारख्या मोठ्या सामन्यात मुंबईने एक महत्त्वाचा बदल केला आहे. मुंबईचा संघ पाहण्यासाठी क्लिक करा...

19:08 (IST)10 Nov 2020
दिल्लीच्या संघात बदल नाही

19:07 (IST)10 Nov 2020
दिल्लीने नाणेफेक जिंकली

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.