गतविजेते मुंबई इंडियन्स आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ यांच्यात आज अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता दुबईच्या मैदानावर दोन्ही संघ समोरासमोर येणार आहेत. आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याची दिल्लीच्या संघाची ही पहिलीच वेळ आहे. अंतिम सामन्यात मुंबईच्या विजयाचं पारडं जड मानलं जात असलं तरीही तीन फॅक्टर सामन्याचं चित्र पालटवू शकतात.
१) सम-विषम वर्षांचा खेळ –
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात मुंबईने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ अशा ४ हंगामात विजेतेपद मिळवलं आहे. ही सर्व विजेतेपद विषम वर्षांत मिळवली आहेत. २०२० हे वर्ष विषम संख्येचं नसल्यामुळे यंदा यंदा निकाल वेगळा लागू शकतो, परंतू मुंबईची आतापर्यंतची कामगिरी पाहता रोहित शर्माचा संघ यंदा हे समीकरण मोडण्याच्या पुरेपूर प्रयत्न करेल.
२) ४ वर्षांचं गणित –
आयपीएलची सुरुवात झाल्यापासून दर ४ वर्षांनी नवीन संघाने स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आहे. २००८ साली स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर राजस्थानने बाजी मारली यानंतर २०१२ साली गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईवर मात करत पहिल्यांदा विजेतेपद पटकावलं. २०१६ डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या संघाने विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे हाच योगायोग सुरु राहिला तर २०२० चा हंगाम दिल्लीच्या नावे जाण्याची शक्यता आहे.
३) रोहित भेदू शकेल का ते चक्रव्यूह –
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघाला विषम वर्षांत सर्व विजेतेपद मिळवून दिली आहेत. रोहित आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत एकदाही सम वर्षात टी-२० चं विजेतेपद मिळवू शकलेला नाही. २००७ साली टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. २००७ हे वर्ष विषम होतं…पण २०१४ साली श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला..हे वर्ष सम होतं. त्यामुळे हेच गणित लावायला गेल्यास मुंबई आजचा सामना गमावू शकतं.