सलग तीन विजयांसह इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाद फेरीचे स्थान निश्चित करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादचे शुक्रवारी होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या  ‘एलिमिनेटर’ सामन्यात पारडे जड मानले जात आहे. परंतु मागील चार सामने गमावणारा बेंगळूरुचा संघ महारथी फलंदाजांच्या बळावर धक्कादायक निकाल देऊ शकतो.

हंगामाची धिमी सुरुवात करणाऱ्या हैदराबादने अखेरच्या टप्प्यात दिमाखदार कामगिरी करीत तिसऱ्या स्थानावर बाद फेरी गाठली. हैदराबादने अखेरच्या तीन सामन्यांत अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स, बेंगळूरु आणि मुंबई इंडियन्स यांना हरवून सावधतेचा इशाराच जणू दिला आहे. साखळीत बेंगळूरुच्या खात्यावरसुद्धा १४ गुणच असले तरी हैदराबादकडे सरस निव्वळ धावगती होती.

हैदराबादच्या मागील काही सामन्यांमधील यशाचे श्रेय कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा या सलामीच्या जोडीला जाते. या जोडीने दिल्ली आणि मुंबईविरुद्ध अनुक्रमे १०७ आणि १५१ धावांच्या भागीदाऱ्या केल्या आहेत. वॉर्नरने आघाडीवर राहून नेतृत्व करताना १४ सामन्यांत एकूण ५२९ धावा केल्या आहेत, तर पहिल्या ११ सामन्यांत संधी न मिळालेल्या साहाने तीन सामन्यांत एकूण १८४ धावा केल्या आहेत. त्यामुळे मनीष पांडे, केन विल्यम्सन, प्रियम गर्ग आणि जेसन होल्डर यांच्यावरील भार हलका झाला आहे.

हैदराबादच्या गोलंदाजीची भिस्त संदीप शर्मा, होल्डर, शाहबाझ नदीम, टी. नटराजन आणि रशीद खान यांच्यावर आहे. ‘पॉवरप्ले’च्या षटकांमध्ये संदीप आणि अखेरच्या षटकांमध्ये नटराजन टिच्चून गोलंदाजी करतो. मधल्या षटकांत रशीदचा सामना करणे आव्हानात्मक ठरते.

दुसरीकडे, बेंगळूरुची भक्कम फलंदाजीची फळी अखेरच्या सामन्यात दिल्लीविरुद्ध कोसळली होती. आरोन फिन्चच्या जागी स्थान मिळालेल्या जोश फिलिपेने संधीचा उत्तम उपयोग केला. परंतु मोठय़ा खेळीत रूपांतर करण्यात त्याला अपयश आले. मात्र हैदराबादविरुद्धच्या सामन्यात फिन्च परतण्याची चिन्हे आहेत. कोहली आणि एबी डीव्हिलियर्सने जबाबदारीने फलंदाजी केल्यास बेंगळूरुला रोखणे आव्हानात्मक ठरेल. ख्रिस मॉरिस, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याममुळे बेंगळूरुची फलंदाजी अधिक सामर्थ्यवान आहे.

दुखापतीमुळे मागील सामन्यात न खेळू शकलेला नवदीप सैनी परतण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय मोहम्मद सिराज, इसुरू उडाना आणि मॉरिस असा वेगवान, तर सुंदर, यजुर्वेद्र चहलचा फिरकी मारा बेंगळूरुकडे आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १,

स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि एचडी वाहिन्या.

१७ उभय संघांत आतापर्यंत १७ सामने झाले असून हैदराबादने नऊ, तर बेंगळूरुने सात लढतींमध्ये विजय मिळवला आहे. एक सामना रद्द करण्यात आला आहे.

Story img Loader