आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सामन्याने तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. सर्व संघ सध्या सराव करत आहेत. कोलकाता नाईट रायडर्ससाठी यंदा आंद्रे रसेलचं फॉर्मात असणं खूप फायदेशीर ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेत खेळत असताना रसेलने धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली होती. रसेलच्या या खेळीचा मराठमोळा खेळाडू सिद्धेश लाडला इतका धसका घेतला आहे की त्याने रसेलला नेट्समध्येही गोलंदाजी न करण्याचं ठरवलं आहे.
मुंबईकर सिद्धेश लाड यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार आहे. रसेलला बॉलिंग करण्याऐवजी मी नेट्समध्ये बुमराहचा सामना करेन असं सिद्धेश लाडने म्हटलंय. “मला कधी ना कधी नेट्समध्ये रसेलला गोलंदाजी करावी लागेल याची मला जाणीव आहे. रसेल किती स्फोटक फलंदाज आहे याची मला कल्पना आहे. मी याआधी त्याला कधीच गोलंदाजी टाकलेली नाहीये. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करुन मी म्हणेन की मला नेट्समध्ये रसेलला बॉलिंग करायला लागू नये.” kkr.in शी बोलत असताना सिद्धेश लाडने आपलं मत मांडलं.
काही दिवसांपूर्वीच KKR चा टीम मेंटॉर डेव्हिड हसीने रसेलच्या खेळाचं कौतुक करताना त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाल्यास तो आयपीएलमध्ये द्विशतकही झळकावू शकतो असं म्हटलं होतं. त्यामुळे यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाची कामगिरी कशी होतेय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
अवश्य वाचा – …तर आंद्रे रसेल आयपीएलमध्ये द्विशतक झळकावू शकतो !