आयपीएलच्या तेराव्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. काही दिवसांपूर्वी धोनीने संघातील काही तरुण खेळाडूंमध्ये स्पार्क जाणवत नसल्याचं वक्तव्य करत सोशल मीडियावर सर्वांची नाराजी ओढवून घेतली होती. आतापर्यंत झालेल्या सामन्यात धोनीने किती तरुण खेळाडूंना सातत्याने संधी दिली असा सवाल विचारला जाऊ लागला. स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनीने अनुभवी खेळाडूंना विश्रांती देऊन संघातील तरुणांना संधी दिली. संघाने आणि कर्णधाराने दिलेल्या या संधीचा पुरेपूर फायदा घेत महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने सलग दोन सामन्यांत अर्धशतक झळकावत आपल्यातली गुणवत्ता सिद्ध केली.

RCB आणि KKR विरुद्ध सामन्यात धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत ऋतुराजने चेन्नईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. धोनीनेही त्याच्या खेळाचं कौतुक केलं. २३ वर्षीय ऋतुराज गायकवाड हा मुळचा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पारगावचा रहिवासी. स्थानिक क्रिकेटमध्ये ऋतुराज महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करतो. २०१६ साली वयाच्या १९ व्या वर्षी ऋतुराजने रणजी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केलं होतं. स्थानिक क्रिकेट स्पर्धेत केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर ऋतुराजला देवधर करंडक, भारत अ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. २०१९ सालात ऋतुराजने धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. भारत अ संघाकडून खेळताना ऋतुराजने श्रीलंका अ आणि वेस्ट इंडिज अ संघाविरुद्ध खेळताना ८ डावांत ११२.८३ च्या सरासरीने ६७७ धावा केल्या. याव्यतिरीक्त २०२० वर्षाच्या सुरुवातीस न्यूझीलंड दौऱ्यात भारत अ संघाकडून खेळताना ऋतुराजने ३ वन-डे सामन्यांत १५४ धावा केल्या होत्या.

त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाने त्याला संघात घेतलं. २०१९ चा संपूर्ण हंगामात ऋतुराजला एकही सामना खेळायला मिळाला नाही. यंदाच्या हंगामात सुरुवातीच्या काही सामन्यांमध्येही त्याला संधी मिळाली, परंतू फलंदाजीची जागा निश्चीत नसल्यामुळे ऋतुराज अपयशी ठरला. परंतू सरतेशेवटी आपल्या नैसर्गिक शैलीप्रमाणे संघाकडून सलामीला येताना ऋतुराजने सलग दोन सामन्यांत अर्धशतक झळकावत स्वतःला सिद्ध केलं. वयाच्या ११ व्या वर्षापासून ऋतुराजने पुण्यात वेंगसरकर अदाकमीत प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. तेराव्या हंगामाआधी चेन्नईचा फलंदाज सुरेश रैनाने स्पर्धेतून माघार घेतली त्यावेळी ऋतुराज गायकवाडला संघात तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळणार अशी चर्चा होती. परंतू युएईत करोनाची लागण झाल्यानंतर ऋतुराज सुरुवातीच्या सामन्यांना मुकला. यानंतर पुढील काही सामन्यांमध्ये संधी मिळाल्यानंतरही त्याचं फलंदाजीतलं स्थान निश्चीत झालं नव्हतं. त्यामुळे आगामी हंगामात ऋतुराजला चेन्नईचं टीम मॅनेजमेंट अधिक संधी देईल अशी आशा चाहते व्यक्त करत आहेत.