आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आपली पराभवांची मालिका खंडीत करण्यात यशस्वी ठरला आहे. सलामीवीर मयांक अग्रवाल, कर्णधार लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने RCB वर ८ गडी राखून मात केली आहे. तेराव्या हंगामात आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या गेलने RCB च्या गोलंदाजांची पिसं काढत अर्धशतक झळकावलं. कर्णधार लोकेश राहुलनेही नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ख्रिस गेलने ५३ तर लोकेश राहुलने नाबाद ६१ धावांची खेळी केली. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी एक धाव हवी असताना निकोलस पूरनने षटकार मारत संघाच्या विजायावर शिक्कामोर्तब केलं.
RCB ने विजयासाठी दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने आक्रमक सुरुवात केली. कर्णधार लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी पहिल्या षटकापासून फटकेबाजी करत बंगळुरुच्या गोलंदाजांवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली. राहुल आणि मयांक ही जोडी स्पर्धेत चांगल्या फॉर्मात असल्यामुळे पंजाबच्या संघ व्यवस्थापनाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत पंजाबला भक्कम सुरुवात करुन दिली. युजवेंद्र चहलने मयांकला बाद करत बंगळुरुला पहिलं यश मिळवून दिलं. मयांकने २५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह धडाकेबाज ४५ धावा केल्या.
मयांक माघारी परतल्यानंतर ख्रिस गेल मैदानावर आला. सुरुवातीच्या षटकांमध्ये गेलला मैदानावर स्थिरावण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागला. यादरम्यान लोकेश राहुलने आपलं अर्धशतक पूर्ण करत सामन्यावर पंजाबचं वर्चस्व कायम राखलं. यानंतर लय सापडलेल्या ख्रिस गेलनेही बंगळुरुच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. शारजाच्या छोट्या मैदानाचा फायदा घेत गेलनेही मोक्याच्या षटकांमध्ये फटकेबाजी केली. अखेरच्या षटकांमध्ये पंजाबच्या फलंदाजांवर अंकुश लावण्यात RCB च्या गोलंदाजांना अपयश आलं.
त्याआधी, पडीकल, फिंच, डिव्हीलियर्स यासारख्या एकाहून एक फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांवर अंकुश लावण्यात पंजाबचे गोलंदाज यशस्वी झाले आहेत. शारजाच्या मैदानावर पंजाबने RCB ला १७१ धावांवर रोखण्यात यश मिळवलं. नाणेफेक जिंकून RCB चा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आश्वासक सुरुवातीनंतर RCB चे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले, ज्यामुळे शारजाच्या मैदानावर यंदा चाहत्यांना चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहता आली नाही.
अवश्य वाचा – IPL 2020 : कोहलीची ‘विराट’ कामगिरी, सामन्याला सुरुवात होण्याआधीच झळकावलं द्विशतक
देवदत पडीकल आणि फिंच या सलामीच्या जोडीने RCB च्या संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. दोन्ही फलंदाजांमध्ये ३८ धावांची भागीदारी झाल्यानंतर अर्शदीप सिंहने देवदत पडीकलला माघारी धाडलं. त्याने १८ धावा केल्या. यानंतर फिंच आणि कर्णधार कोहली यांच्यातही छोटेखानी भागीदारी झाली. परंतू मुरगन आश्विनने फिंचचा त्रिफळा उडवत RCB ला आणखी एक धक्का दिला. शारजाच्या मैदानावर एबी डिव्हीलियर्सची फटकेबाजी पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांची यावेळी मात्र निराशा झाली. चौथ्या क्रमांकावर RCB ने वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली. एकीकडे विराट कोहली संघाची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असताना वॉशिंग्टन सुंदरही आश्विनच्या गोलंदाजीवर माघारी परतला.
सुंदर बाद झाल्यानंतर डिव्हीलियर्स मैदानात येईल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र इकडेही त्यांच्या पदरी निराशाच आली. शिवम दुबेने मैदानावर येऊन विराट कोहलीच्या साथीने संघाचा डाव सावरत, RCB ला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. शारजाचं मैदान छोटं असल्यामुळे यंदा चाहत्यांना डिव्हीलियर्सची फटकेबाजी पहायला मिळणार असा सर्वांचा अंदाज होता. परंतू पंजाबच्या गोलंदाजांनीही टिच्चून मारा करत RCB च्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. १६ व्या षटकाच्या अखेरीस शिवम दुबेही माघारी परतला. १६ व्या षटकापर्यंत RCB ने फक्त १२७ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे यानंतर मैदानात आलेला डिव्हीलियर्स काय करणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.
मात्र डिव्हीलियर्सला अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यासाठी राखून ठेवण्याचा RCB चा प्लान फसला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर १८ व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्ना डिव्हीलियर्स दोन धावा काढून माघारी परतला. फटकेबाजी करुन धावा जमवण्याच्या गडबडीत विराट कोहलीही शमीच्या जाळ्यात अडकल्या. स्लो बाऊन्सरवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात विराट यष्टीरक्षक लोकेश राहुलकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने ३९ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात ख्रिस मॉरिसने फटकेबाजी करत RCB ला १७१ धावांचा पल्ला गाठून दिला.पंजाबकडून मोहम्मद शमी आणि मुरगन आश्विनने प्रत्येकी २ तर अर्शदीप सिंह आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी १-१ बळी घेतला.