दुबईच्या मैदानात आयपीएलच्या १३ व्या हंगामातील पहिला क्वालिफाय सामना पार पडला. या सामन्यात मुंबईनं दिल्लीचा दारूण पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात क्षेत्ररक्षणासाठी दिल्लीचे खेळाडू मैदानात उतरल्यानंतर त्यांच्या दंडावर काळी पट्टी होती. सामना पाहताना अनेकांना हा प्रश्न पडला असेल की, खेळाडूंनी काळी पट्टी का बांधली आहे.
दिल्ली संघातील वेगवान गोलंदाज मोहित शर्माच्या वडिलांचे क्वालिफायर सामन्यापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे अचानक मोहित शर्माला भारतात परतावं लागलं. मोहित शर्माचे वडील महिपाल शर्मा यांना श्रद्धांजली देण्यासाठी दिल्लीच्या खेळाडूंनी सामन्यादरम्यान दंडावर काळी पट्टी बांधली होती. याआधी २२ ऑक्टोबर रोजी मनदीप सिंगच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजली देत किंग्ज इलेव्हन पंजाबच्या खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधली होती.
३२ वर्षीय मोहित शर्मा १३ व्या हंगामात फक्त एक सामना खेळला आहे. या सामन्यात मोहित शर्माला फक्त एक विकेट मिळाली आहे. मोहितने ८६ आयपीएल सामन्यात ९२ विकेट्स घेतल्या आहेत.
दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबईकर फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत निर्धारित २० षटकांत २०० धांवाचा डोंगर उभा केला. दिल्लीविरूद्धच्या सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत मुंबई इंडियन्सने IPL कारकिर्दीत सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. इशान किशन (५५*), सूर्यकुमार यादव (५१) आणि हार्दिक पांड्या (३७*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने २०० धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीचं कंबरडं मोडलं. जसप्रीत बुमराहने १४ धावांत ४ बळी घेत संघाला ५७ धावांनी विजय मिळवून दिला. ट्रेंट बोल्टनेही ९ धावांत २ बळी टिपत विजयात मोलाचा वाटा उचलला.