IPL 2020 : मुंबई इंडियन्स संघानं पहिल्या क्वालिफाय सामन्यात दिल्लीचा दारुण पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबईनं सहाव्यांदा अंतिम फेरीत मजल मारली आहे. १० नोव्हेंबर रोजी मुंबई चषकासाठी मैदानात उतरेल. पण या अंतिम सामन्यापूर्वी मुंबईला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाजीचा धुरा सांभाळणारा आघाडीचा गोलंदाज ट्रेंड बोल्ट दिल्लीच्या सामन्यापूर्वी जखमी झाला आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामात मुंबईसाठी बोल्टने महत्त्वाची भूमिका बजावली होती. पहिल्या सहा षटकांत बोल्टनं सात विकेट घेत प्रतिस्पर्धी संघाला सळो की पळो करुन सोडलं होतं. आता अंतिम सामन्यापूर्वी बोल्ट जखमी झाल्यामुळे रोहित आणि मुंबईच्या चिंतेत वाढ झाली आहे.

बुमराह आणि बोल्ट या जोडीनं आयपीएलच्या १३ व्या हंगामात ४९ विकेट घेतल्या आहेत. बोल्टनं १४ सामन्यात २२ विकेट घेतल्या आहेत. पहिल्या क्वालिफाय सामन्यातील पहिल्याच षटकांत बोल्टनं दिल्लीच्या दोन फलंदाजांना माघारी झाडलं होतं. बोल्टनं पहिल्याच षटकांत दिल्लीचं कंबरडं मोडलं होतं. त्याने पहिल्याच षटकात पृथ्वी शॉ व अजिंक्य रहाणेला शून्य धावेवर बाद केले. यातून दिल्लीचा संघ शेवटपर्यंत सावरलाच नाही. या सामन्यात बोल्टला फक्त दोन षटके गोलंदाजी करता आली. त्यानंतर जखमी असल्यामुळे बोल्ट पुन्हा मैदानात परतलाच नाही. आयपीएलच्या १३ व्या हंगामात बोल्टला दोन वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.

श्रेत्ररक्षण करत असताना १४ व्या षटकांत groin injury मुळे बोल्ट मैदानाबाहेर गेला होता. फायनलपूर्वी बोल्ट जखमी झाल्यामुळे मुंबईसाठी मोठा धक्का मानला जात आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा बोल्टच्या अंतिम सामन्यात खेळण्याबद्दल आशावादी आहे. सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ‘मी बोल्टला पाहिले आहे. मला तो ठीक वाटला. मला नाही वाटत की बोल्टची दुखापत तेवढी मोठी आहे. दोन-तीन दिवसांची विश्रांती घेऊन तो नक्कीच परतेल. ‘

Story img Loader