मुंबईचा संघ प्ले-ऑफ्ससाठी पात्र ठरल्यानंतर पहिल्यांदाच मैदानावर उतरला आणि दिल्लीला ११० धावांवर रोखलं. दिल्लीच्या संघाविरोधात कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर शिखर धवन आणि मुंबईकर पृथ्वी शॉ मैदानात आले. धवन शून्यावर माघारी परतला. तर पृथ्वी शॉदेखील फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोघांनी संघाचा डाव सावरवण्याचा प्रयत्न केला.
कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली. हे दोघे मोठी भागीदारी करणार असं वाटत असताना राहुल चहरच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यर स्टंपिंग झाला. चेंडूचा टप्पा पाहून श्रेयस एक पाय पुढे काढून चेंडू टोलवायला गेला पण चेंडू वळला. याचदरम्यान फटका चुकल्याने श्रेयसचा समतोल चुकला आणि क्षणार्धात क्विंटन डी क़ॉकने त्याला स्टंपिंग करत माघारी धाडलं.
पाहा क्विंटन डी कॉकने केलेलं स्टंपिंग…
अय्यर बाद झाल्यानंतर दिल्लीच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. बुमराह, चहर, बोल्ट, कुल्टर-नाईल यांनी एकामागोमाग एक दिल्लीला धक्के देणं सुरु ठेवलं. स्टॉयनिस, ऋषभ पंत, हर्षल पटेल, शिमरॉन हेटमायर यांनीही फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात आपल्या विकेट फेकल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी ३-३ तर कुल्टर-नाईल आणि चहर यांनी १-१ बळी घेतला.