मुंबईविरूद्धच्या ‘करो वा मरो’च्या सामन्यात हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. गेल्या काही सामन्यात हैदराबादने आव्हानाचा पाठलाग करताना चांगली कामगिरी केली असल्याने कर्णधार वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय आघाडीचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा याने सार्थ ठरवला. मुंबईच्या दोन्ही सलामीवीरांना पॉवर-प्लेच्या षटकांमध्येच त्याने माघारी धाडलं.

दुखापतीनंतर संघात परतलेला मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा केवळ ४ धावा काढून तिसऱ्याच षटकात झेलबाद झाला. त्यानंतर डावाच्या पाचव्या षटकाला क्विंटन डी कॉकने दमदार सुरूवात केली होती. पहिल्या ३ चेंडूवर डी कॉकने १ चौकार आणि २ षटकार हाणले होते, पण चौथ्या चेंडूवर बॅटची कड लागून तो त्रिफळाचीत झाला. रोहित आणि डी कॉक या दोघांनाही संदीप शर्मानेच माघारी धाडले. याचसोबत ५३ बळींसह संदीप पॉवर-प्लेच्या षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. ५२ बळी घेत यादीत अव्वल असलेल्या झहीर खानला त्याने मागे टाकले.

दरम्यान, मुंबईच्या संघाने जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट या दोघांना आजच्या सामन्यात विश्रांती दिली. त्याजागी जेम्स पॅटिन्सन आणि धवल कुलकर्णीला Playing XI मध्ये स्थान मिळालं. तर रोहितचं संघात पुनरागमन झालं. त्याने जयंत यादवची जागा घेतली. याशिवाय हैदराबादच्या संघातही प्रियम गर्गला अभिषेक शर्माच्या जागी स्थान मिळालं.

Story img Loader