जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि इतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर गतविजेत्या मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. २०१ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरुवातच खराब झाली. ट्रेंट बोल्टने एकाच षटकात पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे या दोघांना स्वस्तात माघारी धाडलं. यानंतर बुमराहने शिखर धवनचा त्रिफळा उडवत दिल्लीला तिसरा धक्का दिला. दिल्लीचे बिनीचे शिलेदार शून्यावर बाद झाल्यामुळे संघ चांगलाच संकटात सापडला.
अवश्य वाचा – IPL 2020 : मी निकालाची फारशी चिंता करत नाही – जसप्रीत बुमराह
यानंतरही मार्कस स्टॉयनिसने फटकेबाजी करुन अर्धशतक झळकावल्यानंतर बुमराहनेच त्याचा त्रिफळा उडवत दिल्लीच्या उरल्यासुरल्या आशा संपवून टाकल्या. ४ षटकांत १ षटक निर्धाव टाकून १४ धावा देत ४ बळी घेणाऱ्या बुमराहला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मात्र भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांच्या मते मुंबई विरुद्ध दिल्ली सामन्यात फलंदाजांना सामनावीराचा किताब मिळायला हवा होता. पाहा, काय म्हणतायत मांजरेकर…
When adjudicating the MOM award one must look at how the game was placed at the half way stage, MI had almost sealed the game with their batting. So the match winning impact was made by batsmen. With due respect to Boult & Bumrah, MOM should have been a batsman. #MIvDC
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) November 6, 2020
मुंबईने आपल्या फलंदाजीच्या जोरावर पहिल्या डावानंतरच सामन्यावर आपली पकड बसवली होती. या सामन्यात Match Winning Impact हा मुंबईच्या फलंदाजांनी दाखवला म्हणून सामनावीराचा किताब देताना त्यांचा विचार व्हायला हवा होता असं मत मांजरेकर यांनी व्यक्त केलं. मुंबईकडून फलंदाजीत सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर डी-कॉक आणि सूर्यकुमारने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यानंतर अखेरच्या फळीत शिखर धवन आणि हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत दिल्लीला सामन्यात बॅकफूटला ढकललं.