इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

सलग दोन विजयांनिशी आत्मविश्वास उंचावणाऱ्या सनरायजर्स हैदराबादला बाद फे रीचे स्वप्न साकारण्यासाठी मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) साखळीमधील अखेरच्या लढतीत मुंबई इंडियन्सला हरवण्याशिवाय पर्याय नाही.

हैदराबादचा संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असला तरी निव्वळ धावगती उत्तम राखल्याने मुंबईविरुद्धचा विजय त्यांना अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवून देऊ शकेल.

जॉनी बेअरस्टोला अंतिम ११ जणांमध्ये स्थान न देण्याचा निर्णय घेतल्यापासून हैदराबादला योग्य सांघिक समतोल साधता आला आहे. वृद्धिमान साहा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला सलामीसाठी अप्रतिम साथ देत आहे, तर जेसन होल्डर अष्टपैलुत्व सिद्ध करीत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या मागील सामन्यात होल्डरने संदीप शर्माच्या साथीने हाणामारीच्या षटकांमध्ये टिच्चून गोलंदाजी केली होती. नटराजन आणि फिरकीपटू रशीद खान यांच्यामुळे हैदराबादचा गोलंदाजीचा मारा वैविध्यपूर्ण असा आहे.

दुसरीकडे, पाचव्या ‘आयपीएल’ विजेतेपदाकडे वाटचाल करणाऱ्या मुंबईला दुखापतग्रस्त कर्णधार रोहित शर्माची उणीव तीव्रतेने भासणार आहे. मात्र तरीही मुंबईने मागील दोन सामन्यांत बेंगळूरु आणि दिल्ली कॅपिटल्सला नमवून बाद फे रीतील स्थान सर्वप्रथम निश्चित केले आहे.

ट्रेंट बोल्ट आणि जसप्रित बुमरा ही वेगवान जोडगोळी नवा चेंडू हाताळण्यात पटाईत आहे. किरॉन पोलार्ड कु शलतेने नेतृत्व करीत आहे. रोहितच्या दुखापतीबाबत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जरी सावधतेचा इशारा दिला असला, तरी पोलार्डने मात्र त्याच्या पुनरागमनाची आशा मागील सामन्यानंतर वर्तवली होती. त्यामुळे रोहितच्या तंदुरुस्तीबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे.

शारजात आता धावांचा दुष्काळ

शारजाच्या खेळपट्टीचे स्वरूप आता पूर्णत: पालटल्याचे स्पष्ट होते आहे. ज्या मैदानावर दोनशेहून अधिक धावांचा वर्षांव व्हायचा, तिथे आता कमी धावसंख्येचे सामने होत आहेत.  शनिवारी बेंगळूरुसारख्या संघाला प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १२० धावाच करता आल्या. मग हैदराबादने हे लक्ष्य १४.१ षटकांत पार केले. त्याआधी, २३ ऑक्टोबरला मुंबईने चेन्नईला ९ बाद ११४ धावसंख्येपर्यंत मर्यादित राखले होते. मग हे आव्हान मुंबईने १२.२ षटकांत आरामात पेलले. त्यामुळे नाणेफे कीचा कौल जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी स्वीकारेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

Story img Loader