IPL 2020च्या अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. दुबईच्या मैदानावर झालेल्या फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे IPL विजेतेपद ठरले.

या विजयानंतर सर्वच स्तरातून मुंबई इंडियन्सवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. माजी मुंबईकर खेळाडू आणि आयपीएलमध्ये पंजाबचा सहायक प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या वासिम जाफरनेही मुंबईचं कौतुक करत आता पुढची काही वर्ष जरा आराम करा असं म्हटलं आहे.

१५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरूवात केली. क्विंटन डी कॉक १२ चेंडूत २० धावा करून माघारी परतला, पण रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या साथीने डाव पुढे नेला. रोहितसोबत चांगली भागीदारी असतानाच सूर्यकुमार यादव धावचीत झाला. रोहित हळूच फटका खेळत एकेरी धाव घेण्यासाठी धावला पण रोहित-सूर्यकुमार यांच्यात धाव घेण्यावरून गोंधळ झाला. अखेर रोहित नॉन-स्ट्राईकला पोहोचल्याचं पाहून सूर्यकुमारने आपली क्रीज सोडली आणि स्वत:ला धावबाद करवून घेतलं. सूर्यकुमारने २० चेंडूत १९ धावा केल्या. रोहितने मात्र सूर्यकुमारच्या विकेटचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं नाही. त्याने ५१ चेंडूत दमदार ६८ धावा कुटल्या.

Story img Loader