इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामातील सुरुवातीच्या सातपैकी सहा लढती गमावूनही त्यानंतर सलग पाच सामने जिंकल्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ बाद फेरीच्या शर्यतीत अद्यापही टिकून आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्स त्यांचा विजयरथ रोखणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाबने गेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला सहज धूळ चारली. १२ सामन्यांतून सहा विजय मिळवणाऱ्या पंजाबला विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचे आगमन फलदायी ठरले असून निकोलस पूरन आणि मंदीप सिंगही सातत्याने योगदान देत आहेत. मोहम्मद शमी गोलंदाजीचे नेतृत्व प्रभावीपणे करत असून युवा अर्शदीप सिंगनेही छाप पाडली आहे.

दुसरीकडे गेल्या सामन्यात बलाढय़ मुंबई इंडियन्सला नमवल्यामुळे राजस्थानच्या आत्मविश्वासात कमालीची भर पडली आहे. शतकवीर बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन या दोघांनाही मोक्याच्या क्षणी सूर गवसल्यामुळे राजस्थानची फलंदाजी अधिक बळकट झाली आहे. फक्त कर्णधार स्टीव्ह स्मिथला मात्र कामगिरी सुधारण्याची नितांत गरज आहे. राजस्थानचा संघ तूर्तास १२ सामन्यांतून पाच विजयांसह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ सिलेक्ट