अंतिम फेरीतील प्रवेशासाठी होत असलेल्या लढतीत दिल्लीच्या संघाने धडाकेबाज फलंदाजी करत हैदराबादपुढे १९० धावांचे आव्हान ठेवले. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन याने नावाप्रमाणेच ‘गब्बर’ खेळी करत ५० चेंडूत ७८ धावा कुटल्या. त्याने ६ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याच्या खेळीला मार्कस स्टॉयनीस आणि शिमरॉन हेटमायर या दोघांची साथ मिळाली. त्यामुळे २० षटकांत दिल्लीने ३ बाद १८९ धावा केल्या.
हैदराबादचा भरवशाचा गोलंदाज राशिद खान याला आज एक पराक्रम करण्याची संधी होती. राशिदने ४ षटकांत २६ धावा दिल्या. दिल्लीचा महत्त्वाचा फलंदाज मार्कस स्टॉयनीस याला त्याने त्रिफळाचीत करत तंबूत धाडलं पण त्याला संपूर्ण सामन्यात एकच गडी मिळवता आला. त्यामुळे यंदाच्या हंगामात जसप्रीत बुमराहच्या पराक्रमाशी बरोबरी करण्याची त्याची संधी या सामन्यात हुकली. यंदाच्या हंगामात बुमराहने त्रिफळाचीत किंवा पायचीत अशाप्रकारे १० गड्यांना माघारी धाडलं. राशिदने आज स्टॉयनीसला त्रिफळाचीत करत ९ गड्यांना माघारी धाडलं, पण बुमराहच्या विक्रमाशी मात्र त्याला बरोबरी साधता आली नाही.
Most bowled & LBW wickets in IPL 2020:
10 – Bumrah
9 – Nortje
9 – Rashid Khan
7 – Chahal#IPL2020 #DCvSRH— Bharath Seervi (@SeerviBharath) November 8, 2020
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शिखर धवन आणि मार्कस स्टॉयनीस यांनी ‘पॉवर-प्ले’च्या षटकांत तुफान फटकेबाजी करत ६५ धावा कुटल्या. फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात मार्कस स्टॉयनीस ३७ धावांवर त्रिफळाचीत झाला. शिखर धवनने फटकेबाजी सुरू करत २६ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकलं. धवनसोबत चांगली भागीदारी करताना धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात कर्णधार श्रेयस अय्यर माघारी परतला. त्याने २० चेंडूत २१ धावा केल्या. शिखर धवनने एक बाजू लावून धरत फटकेबाजी केली. ५० चेंडूत ७८ धावा काढून तो माघारी परतला. त्यानंतर शिमरॉन हेटमायरने २२ चेंडूत ४२ धावा करत संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली.