दिल्लीविरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात बंगळुरूच्या संघाने २० षटकात दीडशेपार मजल मारली. सलामीवीर देवदत्त पडीकलचे दमदार अर्धशतक आणि शेवटच्या टप्प्यात एबी डीव्हिलियर्सने केलेली फटकेबाजी याच्या बळावर बंगळुरूने ७ बाद १५२ धावांपर्यंत मजल मारली. एनरिक नॉर्येने ३ बळी टिपत बंगळुरूच्या धावगतीला वेळीचा आवर घातला, पण देवदत्त पडीकलने ४१ चेंडूत ५० धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. त्याचे हे यंदाच्या हंगामातील पाचवे अर्धशतक ठरले.

पडीकलचे अर्धशतक…

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली. बंगळुरूचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना जोशुआ फिलीप (१२) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर सलामीवीर देवदत्त पडीकल आण विराट कोहली यांनी डाव पुढे नेला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर विराटने हवेत मारलेला झेल नॉर्येने सोडला, पण अश्विनच्या गोलंदाजीवर मात्र विराट झेलबाद झाला. विराटने २४ चेंडूत २९ धावा केल्या. त्यानंतर पडीकलने डीव्हिलियर्सच्या साथीने भागीदारी करत डावाला आकार दिला. पडीकलने ४१ चेंडूत ५ षटकारांसह ५० धावा केल्या. त्याचे हे हंगामातील पाचवे अर्धशतक ठरले.

एनरिक नॉर्येचे ३ बळी…

पडीकल बाद झाल्यावर डीव्हिलियर्सने फटकेबाजी केली, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. त्याने २१ चेंडूत २ षटकारांसह ३५ धावा केल्या. शिवम दुबेनेही ११ चेंडूत १७ धावा केल्या. त्यामुळे संघाला १५०पार मजल मारता आली. दिल्लीकडून एनरिक नॉर्येने ३, कगिसो रबाडाने २ तर अश्विनने १ बळी टिपला.

Story img Loader