सलामीवीर बेन स्टोक्सचं अर्धशतक, संजू सॅमसनची फटकेबाजी या जोरावर राजस्थान रॉयल्सने आक्रमक खेळी करत किंग्ज इलेव्हन पंजाबचा विजयरथ रोखला आहे. विजयासाठी मिळालेलं १८६ धावांचं आव्हान राजस्थानने ३ गडी गमावत पूर्ण केलं. स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. त्यामुळे यापुढे प्ले-ऑफची शर्यत अधिक रंगतदार होणार आहे. राजस्थानकडून बेन स्टोक्सने ५० तर संजू सॅमसनने ४८ धावांची खेळी केली.
१८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनेही आश्वासक सुरुवात केली. सलामीवीर बेन स्टोक्स आणि रॉबिन उथप्पा यांनी पहिल्या षटकापासूनच पंजाबच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत फटकेबाजीला सुरुवात केली. बेन स्टोक्सने आक्रमक पवित्रा आजमावत २६ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा केल्या. ही जोडी राजस्थानला मोठी धावसंख्या उभारुन देणार असं वाटत असतानाच स्टोक्स जॉर्डनच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर सॅमसन आणि उथप्पा यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडल्यानंतर राजस्थानचा संघ स्थिरावतोय असं वाटत असतानाच मुरगन आश्विनने उथप्पाला माघारी धाडत राजस्थानला आणखी एक धक्का दिला. उथप्पाने ३० धावा केल्या.
दुसऱ्या बाजूने युवा संजू सॅमसनने कर्णधार स्टिव्ह स्मिथसोबत मैदानात उत्तम भागीदारी करत फटकेबाजीला सुरुवात केली. पंजाबच्या फिरकीपटूंना आपलं लक्ष्य करत सॅमसनने धावांचा ओघ वाढवला. परंतू चोरटी धाव घेताना सॅमसन बदली खेळाडू जगदीशनच्या गोलंदाजीवर धावबाद झाला. त्याने २५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४८ धावांची खेळी केली. मोक्याच्या क्षणी सॅमसनसारखा फलंदाज बाद झाल्यामुळे स्मिथ आणि बटलर यांच्यावर संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आली. या दोन्ही फलंदाजांनी आपली जबाबदारी चोख बजावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पंजाबकडून मुरगन आश्विन आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी १-१ बळी घेतला.
त्याआधी, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलची तुफान फटकेबाजी, आणि लोकेश राहुल व निकोलस पूरन यांनी त्याला दिलेली उत्तम साथ या जोरावर पंजाबने राजस्थानविरुद्ध सामन्यात १८५ धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी शतकी भागीदारी करतसंघाची बाजू लावून धरली. राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेत ख्रिस गेलने ६३ चेंडूत ९९ धावांची खेळी केली. आपल्या झंजावाती खेळीत गेलने ६ चौकार आणि ८ उत्तुंग षटकार लगावले. मैदानात षटकारांचा पाऊस पाडत ख्रिस गेलने टी-२० क्रिकेटमध्ये १ हजार षटकार मारण्याचा विक्रम पूर्ण केला.
नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोफ्रा आर्चरने आपला स्पर्धेतला आतापर्यंतचा चांगला फॉर्म कायम ठेवत पहिल्याच षटकात पंजाबच्या मनदीप सिंहला माघारी धाडलं. मात्र यानंतर मैदानात आलेल्या ख्रिस गेलने लोकेश राहुलला उत्तम साथ देत राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. दोन्ही फलंदाजांनी राजस्थानच्या कमकुवत गोलंदाजीचा फायदा उचलत चौफेर फटकेबाजी केली. विशेषकरुन ख्रिस गेलने राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलंच दडपणात आणलं. ख्रिस गेलने या दरम्यान आपलं अर्धशतकही साजरं केलं. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी करत सामन्यावर वर्चस्व राखलं. लोकेश राहुलही आपलं अर्धशतक पूर्ण करणार असं वाटत असतानाच बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. राहुलने ४६ धावांची खेळी केली.
यानंतर मैदानात आलेल्या निकोलस पूरनने ख्रिस गेलला उत्तम साथ देत धावांची गती कमी होणार नाही याची काळजी घेतली. दोन्ही फलंदाजांनी फटकेबाजी करत पंजाबची धावसंख्या कमी राहणार नाही याची काळजी घेतली. निकोलस पूरन बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्यच्या प्रयत्नात माघारी परतला. यानंतर ख्रिस गेलने अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेत पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. परंतू शतकापासून अवघी १ धाव दूर असताना गेल आर्चरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. राजस्थानकडून बेन स्टोक्सने आणि जोफ्रा आर्चरने २ बळी घेतले.