आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. रोहितने मुंबई इंडियन्सला ४ विजेतेपदं मिळवून दिली आहेत. आतापर्यंत १८८ आयपीएल सामने खेळलेल्या रोहित शर्माच्या नावावर ४ हजार ८९८ धावा जमा आहेत. आयपीएल कारकिर्दीत रोहितची सरासरी ही ३१.६२ अशी असून त्याचा स्ट्राईक रेटही १३०.८२ एवढा आहे. आतापर्यंच्या आयपीएल कारकिर्दीत रोहित शर्माच्या नावावर एक शतक आणि ३६ अर्धशतकं जमा आहेत. २०१३ साली मुंबईकडून खेळत असताना रोहित शर्माने १९ सामन्यांमध्ये ५३८ धावा केल्या होत्या. रोहितची ही सर्वोत्तम कामगिरी मानली जाते.

रोहित शर्मा फॉर्मात असणं मुंबई इंडियन्ससाठी नेहमी महत्वाचं असतं. परंतू यंदा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ख्रिस लिनही मुंबई संघात आल्यामुळे सलामीच्या जोडीत नेमकी कोणत्या फलंदाजाला संधी द्यायची हा यक्षप्रश्न मुंबई इंडियन्ससमोर तयार झाला आहे. २०१९ मध्ये सलामीला येणाऱ्या रोहित शर्मालाही यंदा नेमक्या कोणत्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवायचं हा देखील मुंबईच्या टीम मॅनेजमेंटसमोर प्रश्न असणार आहे. आयपीएलमध्ये रोहित शर्माने सलामीला येण्यापासून मधल्या फळीत अनेकदा फलंदाजी केली आहे. ३४ सामन्यांमध्ये रोहित सलामीला फलंदाजीसाठी आला, ज्यात त्याने १ हजार १८ धावा काढल्या आहेत. ज्यात ८ अर्धशतकांचा समावेश आहे. सलामीला फलंदाजीला येताना रोहित शर्माचा स्ट्राईक रेट हा १३०.५१ चा असून ९८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे सलामीच्या जागेवर रोहित शर्मा चांगली कामगिरी करतो हे दिसून येतंय.

रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत ४० डावांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, ज्यात त्याच्या नावावर ९२० धावा जमा आहेत. आपल्या आयपीएल कारकिर्दीत ठोकलेलं एकमेव शतकही रोहितने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना ठोकलं होतं. याव्यतिरीक्त चौथ्या क्रमांकावरही रोहितने बराच काळ फलंदाजी केली असून, यादरम्यान रोहितच्या नावावर २ हजार ३९२ धावा जमा आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघात रोहित शर्माचं महत्व लक्षात घेता संघ व्यवस्थापन त्याला चौथ्या क्रमांकापर्यंत फलंदाजीसाठी राखून ठेवणार नाही असा अंदाज आहे. परंतू ख्रिस लिन, क्विंटन डी-कॉक आणि रोहित शर्मा या ३ सलामीवीरांमुळे मुंबईच्या संघ व्यवस्थापनासमोर सलामीला कोणत्या जोडीला पाठवायचं हा प्रश्न मात्र नक्की निर्माण झालाय.