विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आश्वासक कामगिरी केली. प्ले-ऑफमध्ये दाखल होण्यासाठी अवघ्या एका विजयाची गरज असताना RCB ला लागोपाठ ३ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. सोमवारी अबु धाबीच्या मैदानावर होणारा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांसाठी करो या मरो चा सामना असणार आहे. संघाचा प्रमुख खेळाडू एबी डिव्हीलियर्सनेही लागोपाठ तीन सामने गमावणं हा खेळाडू म्हणून वाईट अनुभव असल्याचं मान्य केलं आहे.

अवश्य वाचा – Video : नाही, हा नक्कीच नो-बॉल नाही ! पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर माजी खेळाडूंची खोचक टीका

“सलग तीन सामने गमावणं हा खरंच खूप वाईट अनुभव असतो. आम्हाला अशा निकालाची खरंच अपेक्षा नव्हती, पण या स्पर्धेचं स्वरुपच असं आहे, काहीही होऊ शकतं. जर तुम्ही तीन सामने सलग गमावू शकता तर तुम्ही तीन सामने जिंकूही शकता.” हैदराबादविरुद्ध सामन्यात पराभव झाल्यानंतर डिव्हीलियर्सने आपली प्रतिक्रीया दिली. दिल्लीविरुद्धचा सामना आमच्यासाठी महत्वाचा आहे. त्यादिवशी आम्हाला आमचा सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे, असंही डिव्हीलियर्स म्हणाला.

हैदराबादविरुद्ध सामन्यात RCB च्या फलंदाजांनी पुरती निराशा केली. हैदराबादच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी करत बंगळुरूचा डाव ७ बाद १२० धावांवर रोखला. संदीप शर्मा, जेसन होल्डर यांचा भेदक मारा आणि त्याला फिरकीपटूंची मिळालेली साथ याच्या बळावर हैदराबादने विराटसेनेला फटकेबाजीची संधीच दिली नाही. सलामीवीर जोशुआ फिलीप, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर आणि गुरकीरत हे चार फलंदाज वगळता इतरांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. संदीप शर्माने २० धावांत २ बळी टिपले.