दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यात दिल्लीने ६ गडी राखून विजय मिळवत प्ले-ऑफमध्ये दुसरं स्थान पटकावलं. विजयासाठी १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी करत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. लागोपाठ ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर दिल्ली आणि बंगळुरु या दोन्ही संघांना विजय आवश्यक होता. परंतू बंगळुरुने १७.३ षटकांच्या पुढे सामना खेचत कोलकाता नाईट रायडर्सच्या खाली आपला रनरेट जाणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे सामन्यात पराभव झाल्यानंतरही बंगळुरुला प्ले-ऑफमध्ये तिसरं स्थान मिळालं. महत्वाच्या सामन्यात दिल्लीच्या डावाला स्थैर्य देणाऱ्या अजिंक्य रहाणेचं माजी भारतीय खेळाडू विरेंद्र सेहवागने कौतुक केलं आहे.
“फार कमी जणं अजिंक्यला टी-२० खेळाडू म्हणून गृहीत धरतात. तो चौकार-षटकार लगावू शकत नाही असं अनेकांचं म्हणणं असतं. पण अजिंक्यसारखा खंबीर खेळाडू जो अखेरपर्यंत संघात राहून स्थैर्य देऊ शकतो. याआधीच्या सामन्यांमध्ये अजिंक्यने चांगली कामगिरी केली नव्हती. परंतू असं असतानाही पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे यांना संधी देणं हा प्रशिक्षक रिकी पाँटींगसाठी धाडसाचा निर्णय होता. परंतू रिकी पाँटींगने घेतलेला हा निर्णय अजिंक्यने सार्थ करुन दाखवला.” दिल्ली विरुद्ध बंगळुरु सामन्यानंतर सेहवाग Cricbuzz संकेतस्थळाशी बोलत होता.
पृथ्वी शॉ आणि शिखर धवन जोडीने दिल्लीकडून डावाची सुरुवात केली. परंतू पृथ्वी शॉ पुन्हा एकदा अपयशी ठरला…मोहम्मद सिराजने ९ धावांवर शॉचा त्रिफळा उडवला. यानंतर अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत दिल्लीच्या डावाला आकार दिला. ४६ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने अजिंक्य रहाणेने ६० धावांची खेळी केली.