आयपीएलच्या तेराव्या हंगामात अखेरचा सामना खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जने स्पर्धेचा शेवट गोड केला. सुरुवातीच्या टप्प्यात सूर गमावून बसलेल्या चेन्नईने अखेरच्या काही सामन्यांमध्ये चांगलं पुनरागमन करत अनेक संघांच प्ले-ऑफचं गणित बिघडवलं. स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं असलं तरीही ऋतुराज गायकवाडच्या रुपाने चेन्नईला चांगला खेळाडू सापडला आहे. सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी करत ऋतुराजने स्वतःला सिद्ध करत विक्रम आपल्या नावे केला. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी ऋतुराजला सुरुवातीपासून संधी का दिली नाही असा प्रश्न विचारला होता.
अवश्य वाचा – IPL 2020 : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा विक्रम, सलग तिसऱ्या सामन्यात झळकावलं अर्धशतक
पंजाबविरुद्ध सामन्यात विजय मिळवल्यानंतर धोनीने या प्रश्नाचं उत्तर दिलं. “ऋतुराजला आम्ही जेव्हा कधी नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना पाहत होतो तो चांगला खेळत होता. परंतू सामन्यांत त्याच्याकडून सुरुवातीला तशी कामगिरी झाली नाही. त्याआधी त्याला करोना झाला, स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतरही २० दिवस तो पूर्णपणे फिट नव्हता. त्यामुळे त्याचा खेळ कसा आहे याचा अंदाज घेण्याची संधीच आम्हाला मिळाली नाही. याच कारणामुळे आम्ही फाफ डु-प्लेसिस आणि शेन वॉटसन यांच्यावर विश्वास दाखवला.”
पंजाबविरुद्ध सामन्यातही ऋतुराज गायकवाडने आश्वासक खेळी केली. विजयासाठी मिळालेल्या १५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने चांगली सुरुवात केली. डु-प्लेसिस आणि गायकवाड जोडीने पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. डु-प्लेसिस माघारी परतल्यानंतर गायकवाडने आश्वासक फटकेबाजी करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ४९ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ऋतुराजने नाबाद ६२ धावा केल्या.
अवश्य वाचा – IPL 2020 : अब तुम्हारे हवाले…आगामी हंगामात धोनीने दिले मोठ्या बदलाचे संकेत