आयपीएलमध्ये गेल्या ५२ दिवसांपासून सुरु असलेल्या रणसंग्रामचा विजेता कोण ठरणार याचा निर्णय आज होणार आहे. मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा आयपीएलचा विजेता ठरणार की दिल्ली मुंबईला पराभूत करत पहिल्यांदाच आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सध्या दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असून आज होणार अंतिम सामना रंगतदार होईल यात काही शंका नाही.
अंतिम सामना खेळताना असणाऱ्या दबावाच मुंबई इंडियन्सला चांगलाच अनुभव आहे. मुंबई आतापर्यंत पाचवेळा अंतिम सामन्यात पोहोचलेली असून त्यातील चार वेळा जिंकली आहे. दुसरीकडे दिल्ली पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहोचली असून मुंबईला पराभूत करताना त्यांना सर्वोत्तम खेळी करावी लागणार आहे. अंतिम सामन्यासाठी सध्या दोन्ही संघाचे खेळाडू कसून सराव करत आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सचा ऑल राऊंडर खेळाडू कायरन पोलार्डने महत्वाचं वक्तव्य केलं आहे.
पोलार्डने १५ सामन्यांमध्ये १९०.४४ च्या सरासरीने २५९ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा जखमी झाल्यानंतर त्याच्या अनुपस्थितीत पोलार्डने संघाचं नेतृत्व केलं होतं. पोलार्डने आयपीएलचा अंतिम सामना इतर सामन्यांप्रमाणेच खेळला पाहिजे सांगताना वर्ल्ड कपच्या सामन्याशी तुलना केली आहे. वर्ल़्ड कपनंतर आयपीएलच्या अंतिम सामन्याचं सर्वाधित महत्व आहे असं पोलार्डने म्हटलं आहे.
“या खेळाचं नाव दबाव आहे. अंतिम सामन्यात प्रत्येकजण दबावात असतो. तुम्हाला विजयी व्हायचं असतं आणि सोबत कोणती चूकही करायची नसते. पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला एका इतर सामन्याप्रमाणेच हा सामना खेळावा लागतो. मैदानात जा आणि तिथे आनंदाने केळा,” असं पोलार्डने म्हटलं आहे. मुंबई इंडियन्सने ट्विटरला पोलार्डचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
“सामन्यात कोणतेही प्रेक्षक नसतील, पण खेळाचा आनंद घेतला जाऊ शकतो. हा आयपीएलचा अंतिम सामना आहे. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानंतर सर्वाधिक मोठा सामना आहे,” असं पोलार्डने म्हटलं आहे.