IPL 2020 FINAL: IPL 2020च्या अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. दुबईच्या मैदानावर झालेल्या फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे IPL विजेतेपद ठरले. “मुंबईच्या खेळाडूंनी अफलातून विजय मिळवला. सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. खेळाडूंसोबतच सपोर्ट स्टाफचेही कौतुक. गेल्या वर्षी ज्या पद्धतीची कामगिरी केली होती, त्याचप्रकारची कामगिरी यंदाही केल्याने संघाला विजय मिळवणं सोपं गेलं”, असे सचिनने ट्विट केले.
What a victory by the boys! Complete domination by @mipaltan!
Well done to the players and the support staff who have continued from where they left off last year. #MIvDC #IPLFinal pic.twitter.com/ncRaxDUgLl
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 10, 2020
फायनलच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओत सचिनने मुंबईच्या संघासाठी एक महत्त्वाची सकारात्मक गोष्ट सांगितली होती. “मुंबईसाठी तुम्ही जेव्हा मैदानावर खेळायला उतरता तेव्हा तुम्ही केवळ एक व्यक्ती नसता, तर संपूर्ण उर्जेचा समूह असता. सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईचा संघ म्हणजे एक कुटुंब आहे. IPLसारख्या स्पर्धेचा वेग हा प्रचंड असतो. अशा वेगवान स्पर्धेत अनेक अडथळे आणि आव्हानं असतात. पण संघाच्या चांगल्या-वाईट गोष्टींमध्ये आपण सगळे एकमेकांच्या सोबत असतो. त्यामुळे सर्वस्व पणाला लावून खेळा”, असा सल्ला सचिनने व्हिडीओच्या माध्यमातून दिला होता.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी ९६ धावांची भक्कम भागीदारी केली. ऋषभ पंतने ५६ तर श्रेयस अय्यरने नाबाद ६५ धावांची खेळी केली. १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरूवात केली. रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या साथीने विजयाचा पाया रचला. रोहित धावा काढून बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि कृणाल पांड्या जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.