भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन मुद्दे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. आधी चेन्नईच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला करोनाची लागण झाली. त्यानंतर रैनाने IPL 2020मधून माघार घेतली. दोन दिवसांनी त्याच्या माघारीमागे धोनी आणि त्याच्यातील वाद कारणीभूत असल्याचे CSKचे मालक एन श्रीनिवासन यांनी सांगितलं. नंतर त्यांनीच त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर अखेर रैनाने स्वत: मुलाखत देत CSKशी कोणताही वाद नसल्याचं सांगितलं. पण त्याचसोबत घर आणि कुटंबीयांना माजी गरज असल्याचेही सांगितलं. अशा परिस्थितीत रैना CSKच्या संघासोबत या हंगामात खेळेल की नाही याबाबत थोडी शंकाच आहे. पण त्याने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे चेन्नईच्या चाहत्यांना हायसे वाटत आहे.
सुरेश रैना त्याच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतात परतला. इथे त्याला नियमानुसार क्वारंटाइन करण्यात आले. त्यानंतर अनेक चर्चा रंगल्या. त्यावर रैनाने ट्वीट करून स्पष्टीकरण दिलं. तसंच एका मुलाखतीत त्याने पुनरागमनाचे संकेतही दिले होते. त्यात रैना म्हणाला होता की मी क्वारंटाइन असलो तरी माझा सराव सुरू आहे. त्याच सरावाचा व्हिडीओ त्याने पोस्ट केला.
View this post on Instagram
काय म्हणाला होता रैना…
“CSK माझं कुटुंब आहे. धोनी माझ्यासाठी खूप जवळची आणि महत्त्वाची व्यक्ती आहे. त्यामुळे माझ्यासाठी माघारीचा निर्णय खूप कठीण होता. पण माझ्यात आणि CSKमध्ये कोणताही वादविवाद नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. मी सध्या इथे क्वारंटाइन असलो तरीही माझा क्रिकेटचा सराव सुरू आहे. कुणी सांगावं… कदाचित मी तुम्हाला पुन्हा एकदा CSKच्या कॅम्पमध्येही दिसेन”, असे रैनाने सांगितलं.
“माघार घेण्याचा निर्णय हा माझा वैयक्तिक निर्णय होता. मला माझ्या कुटुंबासाठी परत येणं गरजेचं होतं. त्यावेळी मला माझ्या कुटुंबीयांसोबत घरी असणं क्रमप्राप्त होतं. एखादं महत्त्वाचं कारण असल्याशिवाय कोणी १२.५० कोटींचा करार मागे सोडून माघारी परतत नाही. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालो असलो तरी मी अद्याप तंदुरूस्त आहे. IPLमध्ये CSKसाठी मी अजून चार ते पाच वर्षे नक्की खेळणार आहे”, असा विश्वास त्याने व्यक्त केला.