आयपीएलच्या तेराव्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सने धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दिल्लीविरुद्ध क्वालिफायर सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी बहारदार कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने ४ षटकांत १ षटक निर्धाव टाकत १४ धावा देत दिल्लीच्या ४ फलंदाजांना माघारी धाडलं. मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड बुमराहच्या कामगिरीवर चांगलेच खुश झाले आहेत.
“जसप्रीत बुमराहला मैदानात सर्वोत्तम कामगिरी करताना पाहणं हा एक वेगळाच आनंद असतो. जगातला सर्वोत्तम टी-२० गोलंदाज आपल्याला नेमून दिलेलं काम अतिशय योग्य पद्धतीने करत आहे.” दिल्लीविरुद्ध सामन्यानंतर शेन बाँडने बुमराहचं कौतुक केलं. दिल्लीविरुद्ध सामन्यात बोल्टनेही २ बळी घेत बुमराहला उत्तम साथ दिली. ५७ धावांनी विजय मिळवत मुंबईने अंतिम फेरीत प्रवेश नोंदवला आहे.
दरम्यान, पहिल्या एलिमिटेटर सामन्यात हैदराबादने रंगतदार सामन्यात विराट कोहलीच्या RCB वर ६ गडी राखून मात केली. या पराभवामुळे RCB चं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. दिल्ली आणि हैदराबादचा संघ आता दुसरा क्वालिफायर सामना खेळतील, या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत विजेतेपदासाठी मुंबईशी लढत देणार आहे.
अवश्य वाचा – IPL 2020 : मी निकालाची फारशी चिंता करत नाही – जसप्रीत बुमराह