आयपीएलच्या तेराव्या हंगामात कर्णधार लोकेश राहुल आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आश्वासक खेळ केला. सुरुवातीचे सामने गमावल्यानंतरही पंजाबने मोक्याच्या क्षणी विजयाचा धडाका लावत अनेक संघांची गणितं बिघडवली. प्ले-ऑफचं तिकीट मिळवण्यात पंजाबच्या संघाला अपयश आलेलं असलं तरीही त्यांच्या झुंजार वृत्तीचं यंदा चांगलंच कौतुक झालं. आयपीएलचा पुढचा हंगाम अवघ्या काही महिन्यांनी आयोजित केला जाणार असल्यामुळे पंजाबने पुढच्या हंगामासाठीही लोकेश राहुल आणि अनिल कुंबळे या जोडीवर विश्वास दाखवण्याचं ठरवलं आहे.

पंजाबच्या संघमालकांपैकी सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. “संघमालक कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या कामगिरीवर खुश आहेत. राहुलने फलंदाजीत खूपच चांगली कामगिरी केली आणि त्याच्या नेतृत्वाखाली पंजाबने यंदाच्या हंगामात चांगलं पुनरागमन केलं होतं. दिल्लीविरुद्ध सामन्यात पंचांचा शॉर्ट रनचा निर्णय आम्हाला महागात पडला, नाहीतर आज चित्र वेगळं दिसू शकलं असतं.” सूत्राने माहिती दिली.

मॅक्सवेलचा पत्ता कट होण्याचे संकेत

 

एकीकडे संघाने राहुल आणि कुंबळे यांना आपला पाठींबा दर्शवला असला तरीही संघातील अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचं स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे. मॅक्सवेलसाठी पंजाबने १०.७५ कोटी तर शेल्डन कोट्रेलसाठी ८.५ कोटी रुपये मोजले. मात्र दोन्ही खेळाडूंना आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे पुढील हंगामात या दोन्ही खेळाडूंचा पत्ता कट होण्याचे संकेत सूत्राने दिले आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय आढावा बैठकीत घेतला जाणार आहे.

Story img Loader