वैयक्तिक कारणास्तव आगामी इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) माघार घेणाऱ्या सुरेश रैनाऐवजी इंग्लंडच्या डेव्हिड मलानचा चेन्नई सुपर किंग्जच्या संघात समावेश करण्यात येऊ शकतो.

रैनाने दोन आठवडय़ांपूर्वी ‘आयपीएल’मध्ये खेळणार नसल्याचे सांगितले. रैनाच्या माघारीनंतर चेन्नईने अद्यापही नव्या खेळाडूची निवड केलेली नाही. परंतु नुकताच फलंदाजांच्या जागतिक ट्वेन्टी-२० क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेणाऱ्या डावखुऱ्या मलानला सहभागी करून घेण्यासाठी चेन्नई उत्सुक असल्याचे समजते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मलानने सर्वाधिक १२९ धावा केल्या. मात्र एका संघात आठच विदेशी खेळाडूंचा समावेश करण्यास परवानगी असल्याने चेन्नई मलानला नक्की पसंती देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

करोनामुक्त चहरला सरावाला परवानगी

दुबई : चेन्नई सुपर किंग्जचा प्रतिभावान वेगवान गोलंदाज दीपक चहर करोनातून पूर्णपणे सावरला असून त्याला ‘बीसीसीआय’ने सरावाला प्रारंभ करण्याची परवानगीसुद्धा दिली आहे. २८ वर्षीय चहरला ऑगस्टच्या अखेरच्या आठवडय़ात करण्यात आलेल्या चाचणीदरम्यान करोना झाल्याचे निदर्शनास आले होते. मात्र शुक्रवारी सकाळी करण्यात आलेल्या दुसऱ्या करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्याने चहर आता ‘आयपीएल’च्या तयारीला लागू शकतो.

पहिल्या लढतीसाठी मॉर्गन, कमिन्स उपलब्ध

इंग्लंडचा ईआन मॉर्गन आणि ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स हे कोलकाता नाइट रायडर्सच्या ‘आयपीएल’मधील पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असतील, अशी माहिती संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसूर यांनी दिली. १७ सप्टेंबर रोजी मॉर्गन, कमिन्स अमिरातीत दाखल होणार आहेत. ‘बीसीसीआय’च्या सुधारित नियमानुसार या खेळाडूंना १४ ऐवजी सहा दिवसांचेच विलगीकरण आवश्यक असल्याने ते २३ सप्टेंबरला होणाऱ्या कोलकाताच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी त्यांच्या विलगीकरणाचा कालावधी संपणार आहे.