IPL 2020 स्पर्धेला काहीच दिवस शिल्लक असून आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण गेला आठवडा हा चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खूपच वेदनादायी गेला. CSKच्या एकूण ताफ्यातील १२ सहाय्यक कर्मचारी आणि २ खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे चेन्नई संघाचे २८ ऑगस्टपासून सुरू होणारे प्रशिक्षण शिबीर लांबणीवर पडले. संघाला आणखी एका आठवड्याच्या क्वारंटाइनला सामोरं जावं लागलं. पण अखेर CSKच्या संघाचा क्वारंटाइन संपला आणि धोनीचा युएईतील फर्स्ट लूक पाहायला मिळाला.
चेन्नई सुपर किंग्जने ट्विटरवर धोनी आणि शेन वॉटसन यांचा एकत्र खानपान करताना फोटो पोस्ट केला. इतके दिवस खेळाडू आपापल्या रूममध्ये एकटे क्वारंटाइन होते. आज क्वारंटाइन संपल्यावर त्यांना अखेर एकत्र येऊन जेवणखाण करण्याची संधी मिळाली. त्यात धोनीचा युएईतील फर्स्ट लूक पाहायला मिळाला.
पाहा फोटो-
Watto Thala Dharisanam! #WhistlePodu pic.twitter.com/mkzkVjeXgG
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 4, 2020
दरम्यान, संघाला शुक्रवारपासून सराव सत्राची परवानगी मिळाली. “CSK संघातील खेळाडूंचे सराव सत्र आजपासून सुरू होणार आहे. पहिला करोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले खेळाडू व कर्मचारी वगळता इतर सर्व जण दुसऱ्या आणि तिसऱ्या करोना चाचणीत निगेटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे सराव सत्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाग्रस्त खेळाडू आणि कर्मचाऱ्यांचा विलगीकरण कालावधी (२ आठवडे) पूर्ण झाला की मग त्यांची पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे. तोवर ते विलगीकरण कक्षातच राहणार आहेत”, असे CSKचे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन यांनी पीटीआयला सांगितलं.