महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई संघाचा IPL 2020मधील प्रवास शनिवारी संपला. शेवटच्या सामन्यात पंजाबच्या संघाला पराभूत करून चेन्नईने १२ अंकासह गुणतालिकेत सातवा क्रमांक पटकावला. IPLच्या इतिहासात प्रथमच धोनीच्या चेन्नईला बाद फेरीचं तिकीट मिळवता आलं नाही. तसेच ‘कॅप्टन कूल’ धोनीला स्पर्धेत पहिल्यांदा एकही अर्धशतक झळकावता आलं नाही. यंदाचा हंगाम धोनीसाठी कर्णधार आणि फलंदाज दोन्ही अर्थाने वाईट गेला. धोनीच्या निराशाजनक कामगिरीनंतर माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं.

“जर धोनी असा विचार करत असेल की इतर स्पर्धात्मक क्रिकेट न खेळता की तो प्रत्येक वर्षी फक्त IPL खेळेल, तर त्याला स्पर्धेत चांगली कामगिरी करणं निव्वळ अशक्य होईल. एखाद्या खेळाडूच्या वयाबाबत बोलणं बरोबर नाही, पण सध्या तो जितकं जास्त क्रिकेट खेळेल, तितकी त्याची कामगिरी सुधारेल. जर दहा महिने क्रिकेट खेळलं नाही आणि अचानक स्पर्धेत उतरलं तर काय अवस्था होते, हे आपण यंदा पाहिलं आहे”, असे कपिल देव एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाले.

“जेव्हा तुम्ही दीर्घ काळ क्रिकेट खेळत नाही आणि अचानक मैदानावर उतरता, तेव्हा तुमच्या कामगिरीवर त्याचा परिणाम दिसतो. टी२० क्रिकेटचा बादशाह ख्रिस गेल यालाही हा अनुभव आला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की धोनीने मधल्या काळात प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत राहायला हवं”, असा सल्ला त्यांनी दिला.

Story img Loader