IPL 2019च्या शेवटच्या चेंडूवर मुंबईला एका धावेने सामना जिंकवून देणारा अनुभवी खेळाडू लसिथ मलिंगा याने IPL 2020 स्पर्धेतून बुधवारी माघार घेतली. मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. मलिंगाने वैयक्तिक कारणामुळे कुटुंबासोबत राहावं लागत असल्याचे कारण देत स्पर्धेतून माघार घेतली. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटीन्सनला संघात समाविष्ट करण्यात आलं. तो अबुधाबीतील मुंबई संघाच्या ताफ्यात आठवड्याच्या अखेरीस दाखल होणार असल्याचे संघ व्यवस्थापनाच्या पत्रकात सांगण्यात आले.
मुंबई इंडियन्सच्या या बातमीनंतर सर्व चाहत्यांनी बुमराह, मलिंगासारखाच वेगवान असलेला ट्रेंट बोल्ट कुठे आहे? असा प्रश्न मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाला विचारण्यास सुरूवात केली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याला IPL 2020 साठी मुंबईने आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. गेल्या वर्षी बोल्ट हा दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळला होता. पण या हंगामात दिल्लीने बोल्टला मुंबई इंडियन्सशी ट्रेड केले.
मलिंगाच्या जागी पॅटीन्सनची वर्णी लागल्यानंतर साऱ्यांनी बोल्ट कुठाय असा सवाल विचारण्यास सुरूवात केली. त्यानंतर मुंबई इंडियन्सने थेट एक फोटोच पोस्ट केला आणि साऱ्यांना त्याबद्दल उत्तर दिलं. बोल्ट न्यूझीलंडहून उड्डाण करत असून लवकरच अबुधाबीमध्ये पोहोचत असल्याची माहिती मुंबई इंडियन्सने दिली.
२०१४ मध्ये बोल्टने IPL मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ३३ सामन्यात त्याने ३८ बळी टिपले. २०१८ साली त्याला ‘दिल्ली कॅपिटल्स’ संघाने जवळपास २ कोटी २५ लाख रुपयांना खरेदी केले होते. दिल्लीकडून दोन हंगामात खेळल्यानंतर बोल्ट आता IPL 2020 मध्ये मुंबईकडून खेळणार आहे.