बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाचा जलदगती गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. तब्बल ७ महिन्यांनी बांगलादेशचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार असल्यामुळे संघाला मुस्तफिजूरची जास्त गरज असल्याचं सांगत त्याला ना-हरकत प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ मुस्तफिजूरला संघात स्थान देण्यासाठी उत्सुक होते. लसिथ मलिंगाने माघार घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याच्या जागेवर जेम्स पॅटिन्सनला संधी दिली आहे. परंतू दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स हॅरी गुर्नेच्या जागी नवीन खेळाडूच्या शोधात आहे. “होय, मुस्तफिजूरला आयपीएलमध्ये खेळण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. परंतू आमचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असल्यामुळे त्याला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही.” बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या Cricket Operation विभागाचे चेअरमन अक्रम खान यांनी Cricbuzz शी बोलताना माहिती दिली.
२४ ऑक्टोबरपासून बांगलादेशच्या श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. बांगलादेशचा संघ श्रीलंकेत ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मुस्तफिजूर रेहमानने याआधीही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, सनराईजर्स हैदराबाद या संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
अवश्य वाचा – IPL 2020 : हरभजन सिंहची स्पर्धेतून माघार, CSK संघासमोरची चिंता वाढली