सनराईजर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर विराट कोहलीच्या RCB संघाचं आयपीएलच्या तेराव्या हंगामातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. चांगली सुरुवात केल्यानंतर अखेरच्या टप्प्यात बंगळुरुची गाडी रुळावरुन घसरली. संघाच्या पराभवानंतर विराट कोहलीने RCB च्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. माजी खेळाडू गौतम गंभीरने विराटला सर्वातप्रथम जबाबदारी घेत राजीनामा दे अशी मागणी केली. यानंतर संजय मांजरेकर यांनी एक पाऊल पुढे जात RCB च्या टीम मॅनेजमेंटला विराट कोहलीबद्दल निर्णय घ्यावा लागेल असं म्हटलं आहे.
अवश्य वाचा – BLOG : RCB आणि विराटला नव्याने विचार करण्याची गरज !
“आता ही गोष्ट कर्णधारावर अजिबात अवलंबून राहिलेली नाही. याबद्दल टीम मॅनेजमेंट आणि मालकांनी निर्णय घ्यायला हवा. कारण संघाला कशाप्रकारच्या कर्णधाराची गरज आहे आणि नेतृत्व कोण करेल हे निर्णय हीच मंडळी घेत असतात. जर तुम्हाला परिस्थितीत बदल झालेला पहायचा असेल आणि चांगले निकाल हवे असतील तर कर्णधार बदलणं गरजेचं आहे. विराट कोहलीने स्वतः हात वर करत मी चांगली कामगिरी केली नाहीये हे सांगणं मला अपेक्षित नाहीये. माझ्या मते इकडे संघाच्या मालकांनी हा निर्णय घेतला पाहिजे. जर RCB चा संघ आतापर्यंत एकही विजेतेपद जिंकू शकलेला नाही तर मी यासाठी संघ मालकांना जास्त दोषी धरेन कारण त्यांनी संघाला योग्य नेतृत्व दिलं नाही.” ESPNCricinfo शी बोलत असताना मांजरेकर यांनी आपलं मत मांडलं.
गेल्या काही हंगामांपासून गुणतालिकेत तळातल्या स्थानावर असलेल्या RCB च्या संघाने यंदा आपल्या चाहत्यांना विजेतेपदाची स्वप्न दाखवली होती. परंतू मोक्याच्या क्षणी कच खात लागोपाठ झालेले पराभव, दोन खेळाडूंवर संपूर्ण संघाचा डोलारा उभा करणं यासारख्या अनेक गोष्टी यंदाही RCB ला चांगल्या महागात पडल्या. त्यामुळे पुढील हंगामात RCB चं मॅनेजमेंट संघात काही बदल करतं हा हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवश्य वाचा – IPL 2020 : विराटने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला नाही – गावसकर