कर्णधार ओएन मॉर्गनचं नाबाद अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने महत्वाच्या सामन्यात १९१ धावांपर्यंत मजल मारली आहे. स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी राजस्थान रॉयल्सला १९२ धावांचं आव्हान पार करायचं आहे. सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करताना राजस्थानच्या संघाने आश्वासक मारा केला. परंतू संघ संकटात सापडलेला असताना कर्णधार मॉर्गन आणि आंद्रे रसेलने फटकेबाजी करत राजस्थानसमोर मोठं आव्हान निर्माण केलं. मॉर्गनने नाबाद ६८ धावांची खेळी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीत ५ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नितीश राणा शून्यावर बाद झाला. त्यानंतर शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी या फलंदाजांनी संयमी खेळ करत कोलकाताचा डाव सावरला आणि दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. पण तेवातियाने शुबमन गिलला (३६) बाद केलं. पाठोपाठ सुनिल नारायणही शून्यावर माघारी परतला. नंतर दिनेश कार्तिकही शून्यावर तंबूत परतला. या तिघांचे बळी राहुल तेवातियाने टिपले. यासह यंदाच्या हंगामात २००पेक्षा अधिक धावा आणि १० गडी पटकावणारा राहुल तेवातिया पहिलावहिला अष्टपैलू खेळाडू ठरला.

दरम्यान, कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने धडाकेबाज खेळी केली. त्याने ३५ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावा केल्या आणि संघाला १९१ धावांपर्यंत पोहोचवलं.